ऑनर व्ही 10 : जाणून घ्या सर्व फीचर्स
By शेखर पाटील | Published: November 29, 2017 12:14 PM2017-11-29T12:14:36+5:302017-11-29T12:15:17+5:30
ऑनर कंपनीने आपल्या ऑनर व्ही १० या फ्लॅगशीप मॉडेलची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
हुआवेची उपकंपनी असणार्या ऑनरच्या व्ही 10 या मॉडेलची गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून होती. अखेर याला अधिकृतपणे बाजारपेठेत उतारण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज, ६ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज अशा तीन पर्यायांमध्ये ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे. ब्लॅक, अरोरा ब्ल्यु, गोल्ड आणि रेड या चार रंगांमध्ये हा स्मार्टफोन पहिल्यांदा चीनमध्ये उपलब्ध होणार असून लवकरच भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येण्याची शक्यता आहे.
ऑनर व्ही १० या मॉडेलमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस अर्थात २१६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा फुल व्ह्यू या प्रकारातील तसेच १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात ऑक्टा-कोअर किरीन ९७० प्रोसेसर असेल. तर याच्या तिन्ही आवृत्त्यांमधील स्टोअरेज २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. फास्ट चार्जिंग सपोर्टसह यात ३७५० मिलीअॅम्पिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ऑनर व्ही १०च्या मागील बाजूस एलईडी फ्लॅश, पीडीएएफ आणि एफ/१.८ अपार्चरसह २० आणि १६ मेगापिक्सल्सचे कॅमेरे असतील.
यातून फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरिओ आवृत्तीवर आधारित इएमयुआय ८.० या युजर इंटरफेसवर चालणारा असेल. याच्या तिन्ही आवृत्त्यांचे मूल्य भारतीय चलनानुसार २६ ते ३४ हजारांच्या दरम्यान आहे. भारतात मात्र ते यापेक्षा कमी असू शकेल, असे मानले जात आहे.