व्हिडीओ स्ट्रीमिंगमध्ये हॉटस्टार आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 04:47 PM2018-01-03T16:47:23+5:302018-01-03T16:47:51+5:30
भारतातील व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवांमध्ये हॉटस्टार हे पहिल्या क्रमांकावर असल्याचे काऊंटरपॉइंट या रिसर्च फर्मने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीतून अधोरेखित झाले आहे.
काऊंटरपॉइंट या संस्थेने २०१७च्या वर्षअखेर पर्यंतचा ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रीमिंग क्षेत्राबाबतच्या आकडेवारीचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. यात ओटीटी म्हणजेच ओव्हर-द-टॉप या प्रकारातील व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवेत अग्रेसर असणार्या पाच कंपन्यांची माहिती देण्यात आली आहे. यानुसार हॉटस्टार ही सेवा सुमारे ७.५ करोड युजर्ससह या प्रकारात आघाडीवर असल्याचे अधोरेखित झाले आहे. दुसर्या क्रमांकावर १.५ कोटी युजर्स असणारी व्हायकॉम-न्यूज १८च्या मालकीचे असणारे वूथ विराजमान आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओ सेवेने अल्प काळातच आपला पाया मजबूत करत १.१ कोटी ग्राहक जोडले असून ही सेवा तिसर्या क्रमांकावर आहे. तर ५० लाखांच्या वर असणार्या युजर्ससह सोनी लिव्ह चौथ्या आणि ५० लाख ग्राहकांसह नेटफ्लिक्स पाचव्या क्रमांकावर असल्याचे या अहवालातून दिसून आले आहे.
अत्यंत किफायतशीर दरातील स्मार्टफोन्स आणि स्वस्त फोर-जी डाटा प्लॅन्समुळे भारतात व्हिडीओचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तथापि, प्रिमीयम कंटेंटचे ग्राहक अजून खूप कमी आहेत. अर्थात व्हिडीओसाठी पैसे मोजणार्यांची संख्या मर्यादीत आहे.
युट्युबच्यापलीकडे मनोरंजनाचा विचार करणार्यांना व्हिडीओ स्ट्रीमिंगचा उत्तम पर्याय मिळाला आहे. यातील बहुतांश सेवांमध्ये देशी-विदेशी मनोरंजनाचा खजिना उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र या सेवांचे आर्थिक गणीत अद्यापही मजबूत नसल्याचे सिध्द झाले आहे. भारतीय ग्राहकांना मोफत कंटेंट मोठ्या प्रमाणात भावते ही बाब कुणापासून लपून राहिलेली नाही. अगदी व्हिडीओ स्ट्रीमिंगमध्ये अग्रस्थानी असणार्या हॉटस्टारचा विचार केला असता, याच्या ७.५ करोडपैकी अवघे ३ टक्के ग्राहक प्रिमीयम सेवेचा लाभ घेत असल्याचे या अहवालातून दिसून आले आहे. तर उर्वरित ग्राहक मोफत कंटेंटचा वापर करतात. दुसरीकडे अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि नेटफ्लिक्ससारख्या विदेशी सेवांनी भरपूर प्रयत्न केले तरी भारतीय ग्राहकांच्या मानसिकतेचा विचार करता त्यांच्यासमोर मोठी आव्हाने असल्याचेही अधोरेखित झाले आहे.