चकरा नको! आधार कार्डद्वारेच बँक अकाऊंटचा बॅलन्स झटपट चेक करा; जाणून घ्या, स्टेप बाय स्टेप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 03:16 PM2022-09-01T15:16:23+5:302022-09-01T15:18:33+5:30
Aadhaar Card : आधार कार्डच्या मदतीने बँक बॅलन्स तपासणेही खूप सोपे आहे. हे करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करावी लागेल.
नवी दिल्ली - आधार कार्ड हे आता सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट झाले आहे. यामुळेच आता आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी होत नाही. तुम्ही ते वेगवेगळ्या उद्देशांसाठी वापरू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कामाबद्दल सांगणार आहोत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण तुम्ही आधार कार्डच्या मदतीने बँक बॅलन्स सहज तपासू शकता.
विशेष म्हणजे आधार कार्डच्या मदतीने बँक बॅलन्स तपासणेही खूप सोपे आहे. हे करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करावी लागेल. तसेच तुमचा मोबाईल नंबर देखील तुमच्या आधार कार्डशी लिंक केला पाहिजे. इंटरनेट कनेक्शन नसतानाही तुम्ही या प्रक्रियेद्वारे बँक खात्यातील शिल्लक तपासू शकता. फीचर फोनमध्येही बॅलेन्स येतो.
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून *99*99*1# डायल करावे लागेल. यानंतर तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. पुन्हा एकदा आधार क्रमांकाची कम्फर्म करावी लागेल. सर्वकाही टाकल्यानंतर, एक फ्लॅश मेसेज आपल्या समोर दिसेल. UIDAI कडून तुम्हाला एक फ्लॅश मेसेज देखील पाठवला जाईल. बँक खात्यातील बॅलेन्स तपासण्यापूर्वी तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
सावध राहणे खूप महत्त्वाचे
आधार कार्ड सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे वापरले जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे. लक्षात ठेवा आधार कार्डशी संबंधित कोणतीही माहिती तुमच्याकडून फोनवरून कधीही घेतली जात नाही. तुम्हाला OTP बाबतही खूप काळजी घ्यावी लागेल. कारण जर तुम्ही फोनवर कोणाला OTP सांगितला तर तुम्ही एखाद्या घोटाळ्याचे बळी ठरू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.