नवा फ्रॉड! सेल्फीच्या नादात तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; हॅकर्स रचतात 'असा' कट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 03:58 PM2024-11-13T15:58:26+5:302024-11-13T15:59:03+5:30
सायबर फ्रॉडची रोज नवीन प्रकरणं समोर येत आहेत. लोकांची आयुष्यभराची कमाईही लुटली जात आहे. सायबर गुन्हेगार नवनवीन डावपेच अवलंबत आहेत.
सायबर फ्रॉडची रोज नवीन प्रकरणं समोर येत आहेत. लोकांची आयुष्यभराची कमाईही लुटली जात आहे. सायबर गुन्हेगार नवनवीन डावपेच अवलंबत आहेत. आजकाल सेल्फी काढणं हे सामान्य झालं आहे. प्रत्येकाला आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे असतात. पण तुमची ही सवय तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? सायबर गुन्हेगार आता सेल्फीचा वापर करून तुमची पर्सनल आणि बँक अकाऊंटची माहिती चोरू शकतात. यानंतर सायबर अटॅक करून तुमचं बँक अकाऊंट रिकामं केलं जाऊ शकतं.
अनेक ॲप्स आणि वेबसाइट्सवर तुम्हाला तुमच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी सेल्फी घेण्यास सांगितलं जातं. याला सेल्फी ऑथेंटिकेशन म्हणतात. हे एक तंत्रज्ञान आहे जे हे सुनिश्चित करतं की. तुम्ही तीच व्यक्ती आहात ज्याची ओळख तुम्हाला सिद्ध करायची आहे. बहुतेक बँका आणि फिनटेक कंपन्या सेल्फीद्वारे लोकांचं व्हेरिफिकेशन करतात. मात्र, याच तंत्राचा वापर सायबर गुन्हेगारही करू शकतात, ज्याद्वारे ते तुमचा गैरफायदा घेऊ शकतात.
सेल्फी आणि सायबर फ्रॉड
बँक फ्रॉड : सायबर गुन्हेगार तुमच्या सेल्फीचा वापर करून तुमच्या बँक अकाऊंटमध्ये प्रवेश करू शकतात आणि तुमचे पैसे काढू शकतात.
लोन फ्रॉड : हॅकर्स तुमच्या सेल्फीचा वापर करून तुमच्या नकळत तुमच्या नावावर कर्ज घेऊ शकतात.
सिमकार्डचं क्लोनिंग : तुमच्या सेल्फीच्या मदतीने सायबर गुन्हेगार तुमचं सिमकार्ड क्लोन करू शकतात, ज्यावरून ते तुमच्या मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी मिळवू शकतात.
असं ठेवा स्वतःला सुरक्षित
- अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
- कोणत्याही संशयास्पद लिंक्सपासून लांब राहा.
- तुमच्या सर्व अकाऊंटसाठी यूनिक आणि स्ट्राँग पासवर्ड तयार करा.
- सुरक्षा वाढवण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशनचा वापर करा.
- चांगल्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा वापर करून तुमचा फोन मालवेअरपासून सुरक्षित ठेवा.
- सोशल मीडियावर तुमची पर्सनल माहिती शेअर करणं टाळा.
तुम्ही सायबर फ्रॉडला बळी पडल्याचं तुम्हाला वाटत असल्यास, ताबडतोब तुमच्या बँकेशी संपर्क साधा. नेहमी सावध राहा आणि तुमची पर्सनल माहिती कधीही, कोणाशीही शेअर करू नका.