डिजीलॉकरचा वापर कसा कराल? सोपे आणि फायद्याचेही आहे...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 02:56 PM2018-12-12T14:56:59+5:302018-12-12T14:57:45+5:30
डिजीलॉकर हे अॅप आधारवर आधारित आहे.
नवी दिल्ली : महत्वाची कागदपत्रे जवळ बाळगणे आपल्यासाठी नुकसानीचे ठरू शकते. ही कागदपत्रे हरवण्याची भीती मनात कायम असते. यावर एक सोपा उपाय आहे. भारत सरकारने ही कागदपत्रे स्कॅन करून आपल्या स्मार्टफोनमध्ये अधिकृतरित्या बाळगण्याची सोय केलेली आहे. यासाठी डिजीलॉकर हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे.
डिजीलॉकर हे अॅप आधारवर आधारित आहे. याद्वारे वापरकर्त्याला खरी कागदपत्रे सोबत ठेवण्याची गरज राहणार नाही. गुगल प्लेस्टोअरवर जाऊन हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. हे अॅप इन्स्टॉल केल्यावर तुमच्या आधार नंबरने साईन इन करावे लागले. यासाठी आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. या नंबरवर आलेला ओटीपी अॅपमध्ये टाकावा लागणार आहे. यानंतर ईमेल आयडी देऊन पासवर्ड बनवावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला विचारण्यात येईल की मोबाईल पिन सेट करू इच्छिता की नाही. याला तुम्ही स्किपही करू शकता.
लॉगईन केल्यानंतर इश्यूड डॉक्युमेंट ही लिंक दिसेल त्यावर आधारची माहिती असते. यावर क्लिक केल्यानंतर अपलोडेड या पर्यायावर क्लिक करून कागदपत्रांचे फोटो ठेवता येतात. कागदपत्र अपलोड झाल्यानंतर तेथे असलेल्या कागपत्रांची संख्याही दिसते. 1 Issued Documents असे पहिल्यांदा दिसते. यानंतर पाच कागदपत्रे अपलोड केल्यास ही संख्या वाढून 5 Issued Documents असे दिसते.
वाहन चालक परवाना अपलोड केलेला असल्यास आणि तो पोलिसांना दाखविल्यास ते त्यांच्याकडील अॅपवरून पडताळणी करतात. हे अॅप वापरण्यासाठी आधार क्रमांक लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण लॉगईन करताना आधार क्रमांकाची गरज लागते.