एचपी कंपनीचा प्रो ८ व्हाईस कॉलींग टॅबलेट
By शेखर पाटील | Published: September 6, 2017 11:21 AM2017-09-06T11:21:18+5:302017-09-06T11:23:08+5:30
एचपी कंपनीने खास भारतीय युजर्ससाठी तयार केलेला प्रो ८ हा व्हाईस कॉलिंग टॅबलेट बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. एचपी प्रो ८ हा टॅबलेट अनेक उत्तमोत्तम फिचर्सनी सज्ज आहे.
एचपी कंपनीने खास भारतीय युजर्ससाठी तयार केलेला प्रो ८ हा व्हाईस कॉलिंग टॅबलेट बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. एचपी प्रो ८ हा टॅबलेट अनेक उत्तमोत्तम फिचर्सनी सज्ज आहे. मात्र यातील बहुतांश फिचर्स हे भारतीय युजर्सला डोळ्यासमोर ठेवून देण्यात आले आहेत. हा टॅबलेट भारतात उत्पादीत करण्यात आलेला नसला तरी भारतीय युजर्सला आवश्यक असणारे सर्व फिचर्स यात देण्यात आले आहेत. अर्थात हा एचपी कंपनीचा मेड फॉर इंडिया या प्रकारातील टॅबलेट असेल. एचपी प्रो ८ या मॉडेलमध्ये आयरिस आणि फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले असून ते आधारशी संलग्न असेल. याच्या मदतीने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ आणि याबाबतची माहिती कुणीही युजर अगदी सहजपणे मिळवू शकेल. याला बारकोड रीडर आणि प्रिंटरची जोडदेखील देण्यात आली आहे. भारतीय युजर्ससाठी दीर्घ काळापर्यंत चालणारी बॅटरी हा महत्वाचा मुद्दा असतो. नेमकी हीच बाब लक्षात घेत, एचपी प्रो ८ या मॉडेलमध्ये एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १५ तासांपर्यंत चालणारी बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. हा टॅबलेट वॉटरप्रूफ आणि डस्ट रेझिस्टंट असेल. सर्वात महत्वाचे म्हणजे अगदी प्रखर सूर्य प्रकाशातही याच्या डिस्प्लेचा वापर शक्य आहे. याशिवाय हा टॅबलेट २१ भारतीय भाषांच्या सपोर्टने सज्ज असणार आहे.
एचपी प्रो ८ हा टॅबलेट विविध व्हेरियंटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार असला तरी सध्या फक्त याचे बेस मॉडेलच बाजारपेठेत उतारण्यात आले आहे. यात १२८० बाय ८०० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल. ६४ बीट मीडियाटेक एमटी८७३५ प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील बॅटरी ६,००० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. मायक्रो-युएसबीसह यात मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट, हेडफोन जॅक असेल. वर नमूद केल्यानुसार यात व्हाईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. हा टॅबलेट ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स तसेच अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सने सज्ज असेल. हा टॅबलेट ग्राहकांना १९,३७३ रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे.