ड्युअल सेल्फी कॅमेर्यांनी सज्ज एचटीसी यू 11 आईज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 09:40 AM2018-01-16T09:40:27+5:302018-01-16T13:03:18+5:30
एचटीसी कंपनीने ड्युअल सेल्फी कॅमेर्यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा एचटीसी यू 11 आईज हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
गेल्या वर्षी एचटीसी कंपनीने आपले एचटीसी यू 11 हे मॉडेल लाँच केले होते. जून महिन्यापासून याला भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले होते. आता याचीच पुढील आवृत्ती एचटीसी यू 11 आईज या मॉडेलच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे ड्युअल सेल्फी कॅमेरा होय. या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी प्रतिमा घेता येतील. या ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये बोके इफेक्ट देण्याची सुविधाही प्रदान करण्यात आली आहे. तसेच यात ब्युटी मोड आणि फेस स्टीकर्स हे अन्य विशेष फिचर्सदेखील असतील. तर यातील मुख्य कॅमेरादेखील दर्जेदार आहे. यात ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन, एलईडी फ्लॅश आणि अल्ट्रा स्पीड ऑटो-फोकस आदी फिचर्सने सज्ज असणारा 12 मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. तसेच हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आहे.
एचटीसी यू 11 आईज या मॉडेलमधील दुसरे खास फिचर म्हणजे एज सेन्सर प्रणाली होय. याच्या मदतीने टचस्क्रीन डिस्प्लेस स्पर्श न करतांनाही फक्त कडांना हाताने दाबून फोटो काढणे, कोणतेही अॅप कार्यान्वित करणे आदी फंक्शन्स पार पाडता येतात. एवढेच नव्हे तर याच पध्दतीचा वापर करून कुणीही समोरील व्यक्तीस टेक्स्ट अथवा व्हॉईस मॅसेज पाठवू शकतात. उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, एचटीसी यू 11 आईज या मॉडेलमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 652 हा अत्यंत गतीमान प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम 4 जीबी रॅम तर इनबिल्ट स्टोअरेज 64 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येईल. यातील डिस्प्ले हा 6 इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच 1080 बाय 2160 पिक्सल्स क्षमतेचा एलसीडी टचस्क्रीन डिस्प्ले आहे. याचा अस्पेक्ट रेशो 18:9 असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास 3 चे संरक्षक आवरण असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारा असून यात 3920 मेगापिक्सल्स क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार याचे मूल्य 32 हजार रूपये आहे. पहिल्यांदा हे मॉडेल चीनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. लवकरच ते भारतात लाँच होऊ शकते.