तब्बल ५१२ जीबी स्टोअरेजयुक्त स्मार्टफोन
By शेखर पाटील | Published: April 3, 2018 06:00 PM2018-04-03T18:00:00+5:302018-04-03T18:00:00+5:30
हुआवेकडून सर्वाधिक स्टोअरेजचा क्षमता असलेला स्मार्टफोन बाजारात
आपण आजवर २५६ जीबी स्टोअरेज असणार्या स्मार्टफोनबाबत ऐकले असेल. तथापि, हुआवे या कंपनीने तब्बल ५१२ जीबी स्टोअरेज असणारा स्मार्टफोन लाँच करून धमाल उडवून दिली आहे.
हुआवे ही चीनी कंपनी जगातील तिसर्या क्रमांकाची स्मार्टफोन उत्पादक असून आपल्या नाविन्यपूर्ण प्रॉडक्टसाठी ख्यात आहे. या कंपनीने आता सर्वाधिक स्टोअरेजचा स्मार्टफोन बाजारपेठेत आणून अन्य स्पर्धक कंपन्यांना सूचक इशारा दिला आहे. हुआवेने अलीकडेच पोर्शे डिझाईन मेट आरएस या स्मार्टफोनचे अनावरण केले आहे. नावातच नमूद असल्यानुसार यासाठी हुआवेने पोर्शे डिझाईन या ख्यातनाम जर्मन ब्रँडसोबत करार केलेला आहे. या दोन्ही कंपन्यांच्या सहकार्याने हुआवे पोर्शे डिझाईन मेट आरएस हे मॉडेल सादर करण्यात आले आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत. मात्र यातील सर्वात लक्षवेधी फिचर स्टोअरेजचे होय. याचे सर्वात हायर व्हेरियंट हे तब्बल ५१२ जीबी स्टोअरेजची सुविधा असणारे आहे. खरं तर अलीकडच्या काळात १२८ आणि २५६ जीबी स्टोअरेज असणारे काही स्मार्टफोन्स बाजारपेठेत आहेत. तथापि, याच्या पलीकडे जात हुआवेने ५१२ जीबी स्टोअरेज दिले आहे. एका अर्थाने हा स्मार्टफोन एखाद्या संगणक वा लॅपटॉपप्रमाणेच स्टोअरेज असणारा ठरला आहे. यात किरीन ९७० हा गतीमान प्रोसेसर असून याची रॅम ६ जीबी इतकी आहे.
हुआवे पोर्शे डिझाईन मेट आरएस या स्मार्टफोनमधील अन्य अभिनव फिचर म्हणजे याच्या मागील बाजूस तीन कॅमेर्यांचा सेटअप आहे. यातील प्रमुख कॅमेरा हा ४० मेगापिक्सल्सचा आणि आरजीबी या प्रकारातील आहे. दुसरा कॅमेरा हा मोनोक्रोम प्रकारातील असून २० मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. तर तिसरा कॅमेरा हा लेईका टेलिफोटो लेन्सयुक्त आणि ३ एक्स झूमची सुविधा असणार्या प्रकारातील असून ८ मेगापिक्सल्सचा आहे. या तिन्ही कॅमेर्यांच्या मदतीने यात अतिशय दर्जेदार छायाचित्रे काढता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात २४.२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे.
पोर्शे डिझाईन मेट आरएस मॉडेलमध्ये ६ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी ( १४४० बाय २८८० पिक्सल्स) क्षमतेचा फुल व्ह्यू या प्रकारातील ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन वॉटर आणि डस्टप्रूफ आहे. याच्या डिस्प्लेखालील फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. वायरलेस चार्जींगच्या सपोर्टसह यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरिओ या आवृत्तीवर चालणारे असेल. हुआवे पोर्शे डिझाईन मेट आरएस या स्मार्टफोनचे ५१२ जीबी स्टोअरेच्या व्हेरियंटचे मूल्य २०९५ युरो म्हणजेच सुमारे १,६८,६०० रूपये इतके आहे. पहिल्यांदा हे मॉडेल युरोपात मिळणार असून लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.