हुआवे पी२० लाईट : जाणून घ्या सर्व फिचर्स
By शेखर पाटील | Published: March 19, 2018 02:29 PM2018-03-19T14:29:46+5:302018-03-19T14:29:46+5:30
हुआवे कंपनी लवकरच पी२० आणि पी२० प्रो हे उच्च श्रेणीतील स्मार्टफोन सादर करणार असून याआधीच या कंपनीने पी२० लाईट या नावाने नवीन स्मार्टफोन सादर केला आहे.
हुआवे कंपनी २७ मार्च रोजी जागतिक बाजारपेठेत उच्च श्रेणीतील स्मार्टफोन सादर करणार असून याचे टिझर्स आधीच कंपनीने सादर केले आहेत. यांची नावे हुआवे पी२० आणि पी२० प्रो हे असतील असे मानले जात आहे. या लॉचींगच्या आधीच कंपनीने हुआवे पी२० लाईट या नावाने स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने पहिल्यांदा हे मॉडेल चेक गणराज्य व पोलंडमध्ये सादर केले असून त्या देशांमधील हुआवेच्या वेबसाईटवर याची लिस्टींगदेखील करण्यात आली आहे. नावातच नमूद असल्यानुसार ही आगामी स्मार्टफोनची मिनी आवृत्ती असेल हे स्पष्ट झाले आहे. या लिस्टींगनुसार भारतीय चलनाचा विचार करता हे मॉडेल २८ ते ३० हजारांच्या आसपास तेथील ग्राहकांना सादर करण्यात आले आहे.
हुआवे पी२० लाईट या स्मार्टफोनमध्ये ५.८४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २२८० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आणि १९:९ अस्पेक्ट रेशो असणारा आयपीएस एलसीडी डिस्प्ले असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे आवरण असेल. या डिस्प्लेभोवती अतिशय कमी रूंदीच्या कडा असतील. यात ऑक्टा-कोअर कोर्टेक्स-ए५३ प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा इएमयुआय ८.० हा युजर इंटरफेस असेल. याच्या मागील बाजूस १६ आणि २ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे असतील. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या फ्रंट आणि बॅक या दोन्ही बाजूंनी फुल एचडी क्षमतेचे व्हिडीओ रेकॉर्डींग करता येणार आहे. तर फास्ट चार्जींगसह यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची असणार आहे. तर यात फोर-जी नेटवर्क सपोर्ट व फिंगरप्रिंट स्कॅनरसह अन्य रेग्युलर फिचर्स आहेत. हुआवे पी२० लाईट हे मॉडेल पहिल्यांदा युरोपात उपलब्ध करण्यात आले असून लवकरच ते भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे.