हुआवे मेट 10 स्मार्टफोनचे अनावरण

By शेखर पाटील | Published: October 18, 2017 10:23 AM2017-10-18T10:23:43+5:302017-10-18T10:24:41+5:30

हुआवे कंपनीने आपल्या हुआवे मेट १० या फ्लॅगशीप स्मार्टफोनचे अनावरण केले असून यात ड्युअल कॅमेरा सेटअपसह अनेेक उत्तमोत्तम फिचर्स देण्यात आले आहेत.

huawei unveils mate 10 smartphone | हुआवे मेट 10 स्मार्टफोनचे अनावरण

हुआवे मेट 10 स्मार्टफोनचे अनावरण

googlenewsNext

अ‍ॅपल, सॅमसंग आणि शाओमी कंपन्यांनी अलीकडेच फ्लॅगशीप या प्रकारातील स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या स्पर्धेत आता हुआवे कंपनीने उडी घेतली आहे. या अनुषंगाने म्युनिख शहरात आयोजित कार्यक्रमात हुआवे मेट १० या मॉडेलचे अनावरण करण्यात आले. लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर होण्याची शक्यता आहे. फिचर्सचा विचार केला असता हुआवे मेट १० या मॉडेलमध्ये अतिशय दर्जेदार असा लेईका या विख्यात कंपनीचा ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. यातील मोनोक्रोम या प्रकारातील कॅमेरा २० मेगापिक्सल्सचा तर आरजीबी कॅमेरा १२ मेगापिक्सल्सचा असेल. यात ड्युअल टोन एलईडी फ्लॅश, पीडीएएफ, लेसर एएफ, सीएएफ आणि ऑफ्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन आदी फिचर्स असतील. यातून अतिशय उत्तम दर्जाच्या व अगदी सजीव वाटणार्‍या प्रतिमा काढता येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एफ/२.० अपार्चरयुक्त ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. या कॅमेर्‍याने फुल एचडी क्षमतेचे व्हिडीओ रेकॉर्डींग करता येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या कॅमेर्‍यांना नवीन एआय (आर्टीफिशियल इंटिलेजियन्स) इंजिनची जोड देण्यात आली आहे. रिअल टाईम दृश्य आणि पदार्थांच्या अचूक निवडीसाठी याचा उपयोग करता येणार आहे. तसेच यामुळे कोणत्याही वातावरणात अचूक सेटींगसाठी ते उपयुक्त ठरणार आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे या इंजिनच्या मदतीने शब्द व ध्वनीला जगातील तब्बल ५० भाषांमध्ये भाषांतरीत करता येणार आहे.

आता अन्य फिचर्सकडे वळूया. हुआवे मेट १० या स्मार्टफोनमध्ये ५.९ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी (२५६० बाय १४४० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात ऑक्टा-कोअर किरीन ९७० प्रोसेसर असेल. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची व्यवस्था असेल. याच्या पुढील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. सुपरफास्ट चार्जींगच्या फिचरसह यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरिओ या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे असून यावर इएमयुआय ८.० हा युजर इंटरफेस प्रदान करण्यात आला आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. शँपेन गोल्ड, क्लासीक ब्लॅक, पिंक गोल्ड आणि मोचा ब्राऊन या पर्यायांमध्ये याला सादर करण्यात आले आहे. युरोपीआय बाजारपेठेत हुआवे मेट १० या मॉडेलचे मूल्य ६९९ युरो (सुमारे ५३,४०९ रूपये) इतके असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. लवकरच याला भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात येईल अशी शक्यता आहे.

Web Title: huawei unveils mate 10 smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.