ICC World Cup 2019 : भारतीय क्रिकेट संघावरून गुगलने मागितली माफी; वाचा कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 07:54 AM2019-06-02T07:54:43+5:302019-06-02T07:56:26+5:30
विराट कोहलीने चाहत्यांचे आभार मानले होते.
वर्ल्ड कपची सारेच क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. भारतासह जगभरात वर्ल्ड कपचा फिवर चढू लागला असून या लाटेचा फायदा उचलण्यासाठी प्रत्येक ब्रांड काही ना काही करत आहे. यामुळे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेली कंपनी गुगलनेही काहीतरी वेगळे करण्याचे ठरविले होते. क्रिकेटसाठीच्या बाजारात भारत पहिला असल्याने गुगलने भारतीय चाहत्यांसाठी कप्तान विराट कोहलीचा व्हिडिओ पाठवलाही. मात्र, झाले भतलेच. यावरून गुगलला माफी मागावी लागली आहे.
यंदाचा वर्ल्ड कप सुरु होण्याआधी गुगलने हे केले होते. गुगलचे व्हिडिओ कॉलिंग अॅप Duo वर भारतीय चाहत्यांसाठी एक विशेष संदेश पाठविण्यात आला होता. यामध्ये विराट कोहलीने चाहत्यांचे आभार मानले होते. तसेच टीम इंडियाला पाठिंबा देत रहा असेही या व्हिडीओमध्ये म्हटले होते. मात्र, हा व्हिडीओ केवळ भारतीय संघाच्या चाहत्यांनाच पाठवायचा होता. तो इतर संघांच्या चाहत्यांनाही गेल्याने गुगलवर मोठी नामुष्की ओढवली. एका अहवालानुसार अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंडचे चाहते यामुळे खूश नव्हते. त्यांनी गुगलकडे माफी मागावी, अशी मागणी केली होती.
यानुसार गुगलने त्यांच्या एका फोरम वेबसाईटवर माफी मागितली आहे. Google Duo च्या काही युजर्सना गुगलचा एक व्हिडीओ चुकीने पाठवला गेला. ही जाहीरात नव्हती. भारतीय युजर्सना हा व्हिडीओ पाठवायचा होता. हे Duo चे प्रमोशन करण्याचा एक भाग होता. कोणत्याही प्रकारची भावना दुखावली गेल्यास किंवा गैरसमज निर्माण झाल्या माफी मागतो, असा संदेश लिहिला आहे.
गुगलने असे का झाले याचे कारण जरी सांगितले नसले तरीही एका छोट्या चुकीमुळे या व्हिडीओचे लक्ष्य चुकल्याने सर्वांना गेला आहे. गुगलकडे याबाबतच्या तक्रारी आल्यानंतरच माफी मागावी लागल्याचे समजते.