नवीन स्मार्टफोन घेतल्यावर सर्वातआधी करा ही कामे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 13:25 IST2018-07-24T13:24:13+5:302018-07-24T13:25:16+5:30
नवीन फोन घेतल्यावर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असतं. नवीन फोन घेतल्यावर खालील काही गोष्टी केल्यास तुमचा स्मार्टफोन आणखी स्मार्ट होणार....

नवीन स्मार्टफोन घेतल्यावर सर्वातआधी करा ही कामे!
जर तुम्ही नवीन फोन घेतलाय किंवा नवीन फोन घेणार आहात तर तुम्हाला तुमच्या फोनने चांगलं परफॉर्म करावं असंच वाटत असणार. पण नवीन फोन घेतल्यावर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असतं. नवीन फोन घेतल्यावर खालील काही गोष्टी केल्यास तुमचा स्मार्टफोन आणखी स्मार्ट होणार....
पासवर्ड सेट करा
फोन घेतल्यावर सर्वातआधी तुम्ही फोन सुरक्षित करा. यासाठी अलिकडे स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. फिंगर प्रिंट, पासवर्ड, पॅटर्न लॉक आणि फेस रिकॉग्नायझेशन सारखे काही फीचर्स यासाठी वापरू शकता.
फोन फाईंडर अॅप इन्स्टॉल करा
नवीन फोन घेतल्यावर फोन फाईंडर अॅप इन्स्टॉल करा. प्ले स्टोरवर असे अनेक अॅप्स आहेत जे फोन चोरी झाल्यावर तुमच्या फोनचं लोकेशन सांगणे, डेटा नष्ट करणे आणि फोन लॉक करण्याच्या उपयोगात येतात.
कॅमेरा सेट करा
काही लोक केवळ फोटोग्राफीसाठी नवीन फोन खरेदी करतात. जर तुम्हीही केवळ यासाठी फोन घेतला असेल तर आधी कॅमेरा अॅप सेट करा. कॅमेरा अॅपमध्ये अनेक प्रकारचे फीचर्स असतात जे वापरून तुम्ही अधिक चांगली फोटोग्राफी करू शकता. कॅमेरा अॅपमध्ये अनेक फील्टर्स, मोड्स, फ्लॅश, टायमरसारखे फीचर्स असतात. हे फीचर्स गरजेनुसार अॅडजस्ट करा.
होम स्क्रीन कस्टमाईज करा
फोन खरेदी केल्यावर तुम्ही तुमच्या फोनची स्क्रीन कस्टमाईज करा. वॉलपेपर, आयकॉन्स तुम्हाला हवे तसे करून घ्या.
बॅकअपची व्यवस्था
फोन खरेदी केल्यावर आधी बॅकअप फीटर ऑन करा. कोणतीही घटना सांगून घडत नाही. त्यामुळे आधीच काळजी घेतलेली बरी. फोन चोरी गेल्यावर पैशांसोबतच डेटाचंही नुकसान होतं. अलिकडे अनेकप्रकारचे ऑनलाईन स्टोरेज असतात जिथे तुम्ही बॅकअप घेऊ शकता. पण आधी त्या ऑनलाईन स्टोरेजची खात्री करून घ्या.
बॅटरी समजून घ्या
फोनच्या बॅटरीचा वापर समजून घेणे फार महत्वाचे आहे. असे केल्यास तुम्हाला बॅटरीची समस्या येणार नाही. तुम्हाला फोनमधील कोणतं अॅप किती बॅटरीचा वापर करत आहे हे जाणून घ्यावं लागेल. आजकाल स्मार्टफोन्समध्ये अनेकप्रकारचे पॉवर सेव्हिंग मोड फीचर असतात. फोन सेटिंगमध्ये जाऊन हे सेव्हिंग मोड तुम्ही सुरू किंवा बंद करू शकता.
डेटाचा वापर समजून घ्या
बॅटरीसोबतच डेटाचा वापरही समजून घ्या. फोनमधील काही अॅप्स हे बॅकग्राऊंडला सुरु असतात. ज्यामुळे डेटा यूज होत राहतो. अशावेळी अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त डेटा वापरल्याने तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सेटिंगमध्ये जाऊन बॅकग्राऊंडला सुरू असलेल्या अॅप्सची सेटिंग करून घ्या.