5 वर्षांत संपूर्ण जग बदलणार, प्रत्येक इंटरनेट युजरकडे स्वतःचा रोबोट असणार अन्...; Bill Gates यांची भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 02:25 PM2023-11-15T14:25:52+5:302023-11-15T14:27:53+5:30
येणाऱ्या पाच वर्षांत एआयमुळे संपूर्ण भविष्य बदलून जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
सध्या संपूर्ण जगात एआय संदर्भात प्रचंड चर्चा सुरू आहे. एआयला केंद्रस्थानी ठेऊन भविष्याची कल्पना केली जात आहे. यातच आता, मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स यांनीही एआयसंदर्भात भाष्य केले आहे. येणाऱ्या पाच वर्षांत एआयमुळे संपूर्ण भविष्य बदलून जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
पाच वर्षांत प्रत्येकाकडे असेल स्वतःचा रोबोट -
मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स यांच्या मते, लवकरच प्रत्येकाकडे स्वतःचा एक रोबोट असेल, जो युजर्सना अनेक कामात मदत करेल. इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक दुसर्या युजरकडे पर्सनल असिस्टंट असेल. जो आजच्या टेक्नॉलॉजीच्या तुलनेत अत्यंत चांगला असेल. एवढेच नाही, तर एजन्ट्स अधिक स्मार्ट असतात. एखाद्या कामासंदर्भात विचारण्याआधीच सल्ला देण्याची खासियत त्यांच्यात असते.
माणसाला प्रत्येक कामात होईल एआयची मदत -
बिल गेट्स म्हणाले, भविष्यातील पर्सनल असिस्टन्ट प्रत्येक काम करण्यास तरबेज असेल. आज ट्रिप प्लॅनिंगसाठी ट्रॅव्हल एजन्ट्सना पैसे द्यावे लागतात. याच बरोबर ट्रॅव्हल एजन्टला वेळही द्यावा लागतो. जेणेकरून त्यांना आपल्या आवडीप्रमाणे टूरिस्ट स्पॉटही सांगता येतील. या उलट एआय आपल्या युजर्ससाठी ट्रिप प्लॅनही करू शकते. एवढेच नाही, तर एआय युजर्सना त्यांच्या आवडीच्या पदार्थानुसार, रेस्टोरन्ट्सची माहितीही देईल. तसेच, रिझर्व्हेशन बुक करायचेही काम करेल.
एआय असिस्टन्टसाठी मोजावी लागेल मोठी किंमत -
बिल गेट्स यांच्या मते, कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एजन्ट्सची सुविधाही देऊ शकतात. या एजन्ट्सना मिटिंग्समध्येही सहभागी केले जाऊ शकते. जेणे करून त्यांना प्रश्नांची चांगली उत्तरे देता येतील. अशा प्रकारच्या एआय एजन्ट्सना ठेण्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणावर पेसैही मोजू शकतात. भविष्यात अशा प्रकारचे एजन्ट्स अत्यंत महागडे असतील. एवढेच नाही, तर ते केवळ कार्यालयीन कामेच नाही, तर प्रत्येक ठिकाणी ते चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतील.