आता गुगलची ही ई-मेल सेवा बंद होणार
By अनिल भापकर | Published: March 22, 2019 01:33 PM2019-03-22T13:33:18+5:302019-03-22T13:35:32+5:30
गुगलने इनबॉक्स ही ई-मेल सेवा २०१४ साली मोठ्या धुमधडाक्यात सुरु केली होती .इनबॉक्सची सेवा अँड्रॉइड आणि आयफोनवर देखील वापरता येत होती . आता मात्र ०२ एप्रिल २०१९ पासून हि सेवा पूर्णतः बंद करण्याचे गुगलने ठरविले आहे.
अनिल भापकर
इंटरनेट सर्चिंगचा बादशाह आणि ई-मेल सेवेमध्ये अव्वल स्थानी असलेल्या गुगलने इनबॉक्स ही ई-मेल सेवा २०१४ साली मोठ्या धुमधडाक्यात सुरु केली होती . गुगलच्या या ई-मेल सेवेमध्ये युझर्स च्या गरजा लक्षात घेऊन अनेक चांगले फीचर्स देण्यात आले होते. इनबॉक्स ही सेवा जी-मेल सारखी असली तरी ही पूर्णपणे स्वतंत्र अशी सेवा होती . इनबॉक्सची सेवा अँड्रॉइड आणि आयफोनवर देखील वापरता येत होती . आता मात्र ०२ एप्रिल २०१९ पासून हि सेवा पूर्णतः बंद करण्याचे गुगलने ठरविले आहे.
२००४ साली गुगलने जी-मेल च्या माध्यमातून ई-मेल सेवेमध्ये प्रवेश केला . सुरुवातीला प्रति युझर १ जीबी स्टोरेज कॅपॅसिटी जी-मेल कडून देण्यात येत होती जी त्यावेळच्या इतर कुठल्याही ई-मेल सेवा देणाऱ्यापेक्षा खूप जास्त होती . त्यामुळे जी-मेल अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाले.अजूनही ई-मेल सेवा देण्यामध्ये जी-मेलची सेवा वरचढच आहे.
याच गुगलने २०१४ साली इनबॉक्स नावाने एक स्वतंत्र ई-मेल सेवा मोठ्या धुमधडाक्यात सुरु केली होती. युझर्सच्या गरजा लक्षात घेऊन खूप साऱ्या नवीन सुविधेसह इनबॉक्स सुरु करण्यात आले होते . एक परिपूर्ण ई-मेल सेवा कशी होईल या दृष्टीने गुगलने यामध्ये अनेक नवीन फीचर्स दिले होते. जरी इनबॉक्स हि ई-मेल सेवा गुगलने सुरु केली असली तरी सुद्धा जी-मेल हि ई-मेल सेवा सुद्धा चालूच होती .
मात्र मागील वर्षी म्हणजेच सप्टेंबर २०१८ मध्ये गुगलने अचानक जाहीर केले कि गुगलची इनबॉक्स हि ई-मेल सेवा मार्च २०१९ मध्ये बंद करण्यात येईल .गुगलच्या या निर्णयाने खरे तर टेक्नोसॅव्ही जगतामध्ये मोठी खळबळ उडाली होती. ३१ मार्च २०१९ पर्यंतच इनबॉक्सची सेवा बंद होणार होती मात्र गुगलने आणखी दोन दिवसाची मुदतवाढ देत आता ०२ एप्रिल २०१९ रोजी इनबॉक्सची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तशी नोटीसच इनबॉक्स युझर्सला गुगलतर्फे पाठवण्यात आली आहे. इनबॉक्सचे अनेक चांगले फीचर्स हे गुगलकडून जी-मेलमध्ये देण्यात आले आहे.
anil.bhapkar@lokmat.com