फॅबलेटच्या लोकप्रियतेत वाढ

By शेखर पाटील | Published: December 5, 2017 03:16 PM2017-12-05T15:16:44+5:302017-12-05T15:17:22+5:30

मोठ्या आकारमानाचे स्मार्टफोन अर्थात फॅबलेटच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून याचा सरळ फटका लहान डिस्प्ले असणारे स्मार्टफोन आणि टॅबलेटला बसणार असल्याचे ताज्या आकडेवारीतून दर्शविण्यात आले आहे.

The increase in the popularity of phablet | फॅबलेटच्या लोकप्रियतेत वाढ

फॅबलेटच्या लोकप्रियतेत वाढ

googlenewsNext

मोठ्या आकारमानाचे स्मार्टफोन अर्थात फॅबलेटच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून याचा सरळ फटका लहान डिस्प्ले असणारे स्मार्टफोन आणि टॅबलेटला बसणार असल्याचे ताज्या आकडेवारीतून दर्शविण्यात आले आहे.

सध्या साधारणपणे ५.५ इंच आकारमानापेक्षा मोठा डिस्प्ले असणार्‍या स्मार्टफोनला फॅबलेट म्हटले जाते. याच्या आतील वर्गवारी स्मार्टफोन तर ७ इंच वा त्यापेक्षा मोठा डिस्प्ले असणारी उपकरणे टॅबलेट या प्रकारात येतात. म्हणजेच ५.५ ते ७ इंच आकारमानाच्या डिस्प्लेयुक्त उपकरणे फॅबलेट या वर्गवारीत येतात. या अनुषंगाने इंटरनॅशनल डाटा कार्पोरेशन म्हणजेच आयडीसीच्या ताज्या आकडेवारीतून समोर आलेली माहिती नाविन्यपूर्ण आणि स्मार्ट उपकरणांच्या लोकप्रियतेतील बदल दर्शविणारी आहे. या अहवालानुसार २०१७च्या अखेरपर्यंत वर्षभरात १५० कोटी स्मार्टफोनची विक्री अपेक्षित असून यापैकी ६१.१ कोटी म्हणजेच सुमारे ४० टक्के इतका वाटा फॅबलेटचा असेल.

जगात सध्या स्मार्टफोनची लोकप्रियता अबाधित असली तरी याची ग्रोथ थोडीफार मंदावली आहे. याचा विचार करता दरवर्षी सुमारे तीन टक्क्यांच्या वाढीसह २०२१च्या अखेरीस जगात वर्षाला १७० कोटी स्मार्टफोन विकले जातील. तर यातील तब्बल १०० कोटी स्मार्टफोन्स हे फॅबलेट या प्रकारातील असतील असा अंदाज आयडीसीच्या या अहवालात वर्तविण्यात आला आहे. म्हणजेच येत्या चार वर्षात फॅबलेटची विक्री ही लहान डिस्प्लेच्या स्मार्टफोनपेक्षा जास्त असेल. एकीकडे फॅबलेटच्या विक्रीत वाढ होत असतांना टॅबलेटलाही मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. अलीकडच्या कालखंडाचा विचार केला असता गत तिमाहीचा अपवाद वगळता टॅबलेटची विक्री थोडी मंदावल्याचे दिसून येत आहे.

फॅबलेटच्या विक्रीत प्रारंभी सॅमसंगचा मोठा वाटा होता. मात्र अलीकडच्या काळात चीनी कंपन्यांनी जोरदार मुसंडी मारल्यामुळे सॅमसंगची या क्षेत्रात पीछेहाट झाली आहे. ऑपरेटींग सिस्टीमचा विचार केला असता अँड्रॉइडवर चालणारे फॅबलेट सर्वाधीक प्रमाणात विकले जात आहेत. तर दुसरीकडे अ‍ॅपललाही फॅबलेटची महत्ता कळल्याचे दिसून येत आहे. प्रारंभीचे आयफोन मॉडेल्स हे लहान डिस्प्लेंचे असत. मात्र अलीकडच्या काळात लाँच झालेल्या आयफोनचे डिस्प्ले हे आकारमानाने मोठे असल्याची बाब लक्षणीय अशीच आहे. हाच ट्रेंड येत्या कालखंडात कायम राहणार असून अर्थातच फॅबलेटच्या विक्रीत वाढ होणार असल्याचे आयडीसीने स्पष्टपणे नमूद केले आहे.

Web Title: The increase in the popularity of phablet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.