भारतात 1 जीबी डेटा 18.5 रुपयांना तर अमेरिकेत 869 रुपये...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 07:01 PM2019-03-06T19:01:32+5:302019-03-06T19:03:39+5:30
जगातील 230 देशांच्या मोबाईल डेटाच्या किंमतींची तुलना करण्यात आली. यामध्ये भारतात एक जीबी मोबाइल डेटाची किंमत 0.26 डॉलर आहे.
नवी दिल्ली : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये धडक मारल्यानंतर या क्षेत्रात स्पर्धेचे स्वरुपच बदलले आहे. ग्राहकांना कमीतकमी भावात जास्तीजास्त सुविधा देण्याची चढाओढच या क्षेत्रातील मोबाइल कंपन्यांमध्ये लागली आहे. त्यामुळे भारतात मोबाइल डेटाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
Cable.co.uk ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात एक जीबी मोबाइल डेटाची सरासरी किंमत फक्त 18.5 रुपये (USD 0.26) आहे. तर, याच डेटाची किमत जगभरातील काही देशांमध्ये सरासरी 600 रुपये इतकी आहे. जगातील 230 देशांच्या मोबाईल डेटाच्या किंमतींची तुलना करण्यात आली. यामध्ये भारतात एक जीबी मोबाइल डेटाची किंमत 0.26 डॉलर आहे. तर ब्रिटनमध्ये एक जीबी डेटासाठी ग्राहकांना 6.66 डॉलर (468 रुपये) मोजावे लागतात. याशिवाय अमेरिकेत 12.37 डॉलर (869 रुपये) खर्च करावे लागतात. अहवालानुसार, असे सांगण्यात आले आहे की, युवा लोकसंख्या असलेल्या देशात टेक्नॉलॉजीची जागरुकता मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
दरम्यान, भारतात 43 कोटींहून अधिक स्मार्टफोन युजर्स आहेत. 2016 मध्ये अनिल अंबानी यांनी भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये रिलायन्स जिओ लॉन्च केले. तेव्हापासून या क्षेत्रातील मोबाइल कंपन्यांमध्ये आपल्या ग्राहकांना कमीतकमी भावात जास्तीजास्त सुविधा देण्यासाठी चढाओढ लागली. रिलायन्स जिओने फ्री व्हाईस कॉल्स, कमी किंमतीत डेटा यामाध्यमातून जवळपास 28 कोटींहून अधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केल्याचे समजते. यामुळे इतर कंपन्यांनीही कॉल्स आणि डेटाच्या दरात घट केल्याचे दिसून आले.