हॅकर्सच्या निशाण्यावर भारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 11:42 AM2021-03-03T11:42:01+5:302021-03-03T11:43:06+5:30
भारत सध्या जगभरातील हॅकर्ससाठीदेखील ‘कमाईचा मोठा स्रोत’ होऊन बसला आहे!
- प्रसाद ताम्हनकर
‘आयबीएम’ ह्या जगप्रसिद्ध कंपनीच्या ‘एक्स-फोर्स थ्रेट’ अहवालानुसार आशिया प्रांतात जपाननंतर सर्वाधिक सायबर हल्ल्यांचा शिकार झालेला देश भारत आहे. २०२० साली आशियात झालेल्या एकूण सायबर हल्ल्यांपैकी ७% हल्ले हे एकट्या भारतावर करण्यात आले. प्रसिद्ध उत्पादनांचा नकली माल गळ्यात मारून, डाटा लीक करण्याची धमकी देऊन अनेक भारतीयांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आला. सगळ्यात जास्ती, म्हणजे ६०% हल्ले हे फायनान्स आणि इन्शुरन्स क्षेत्रातील कंपन्यांवर करण्यात आले. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवाक्षेत्राचा नंबर आहे.
भारतावर करण्यात आलेल्या एकूण हल्ल्यांपैकी ४०% हल्ले हे ‘रॅन्समवेअर’द्वारे करण्यात आले आहेत. ह्यात युजर्सचा संगणक लॉक करून अथवा डाटा एन्क्रिप्टेड करून तो सोडण्यासाठी खंडणीची मागणी करण्यात येते. अन्यथा डाटा लीक करण्याची धमकी देण्यात येते. २०२० सालात ‘सोदिनोकिबी (Sodinokibi)’ ह्या अत्यंत घातकी मानल्या जाणाऱ्या हॅकर्स ग्रुपने सर्वाधिक धुमाकूळ घातला. गतसालातले २२% हल्ले हे ह्या एकट्या हॅकर्स ग्रुपने केलेले आहेत.
सोदिनोकिबी गटाने जगभरातील निरपराध लोकांना लक्ष्य करून, त्यांचा २१.६ टीबी येवढा प्रचंड डाटा चोरला. ह्या पीडितांपैकी २/३ लोकांनी खंडणी देऊन आपल्या डाटाची सुटका करून घेतली, तर ४३% डाटा ह्या गटाकडून लीक करण्यात आला. आयबीएमच्या अहवालानुसार, सोदिनोकिबीने गतसाली जगभरातून खंडणीपोटी ८९० कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. जुलै महिन्यात भारतावर सगळ्यात जास्ती सायबर हल्ले करण्यात आले. गूगल, पे-पालपासून ते आदिदासपर्यंत अनेक जगप्रसिद्ध ब्रॅण्डसची हुबेहूब नक्कल करीत हॅकर्सनी अनेक भारतीयांना गंडा घातला.
भविष्यात क्लाऊड सर्व्हिसेस वापरणे अनिवार्य होईल. या सर्व्हिसेसवरती हल्ले होण्याची शक्यताही बळावेल. सर्वच कंपन्यांनी ‘कॉन्फिडेन्शल कॉम्प्युटिंग’सारख्या तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त वापर सुरक्षित राहण्यासाठी करण्याची गरज असल्याचेदेखील ह्या अहवालात सांगितले आहे. ह्या तंत्रज्ञानात डाटा प्रोसेस होत असतानाच ‘इन्क्रिप्ट’ केला जात असल्याने, तो अधिक सुरक्षित राहतो.