भपकेबाजीत भारतीय आघाडीवर! महागडे फोन घेण्यात जगात लागतो एक नंबर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 10:07 AM2024-01-04T10:07:47+5:302024-01-04T10:08:03+5:30
खरेतर हा सर्व शोबाजीचा खेळ आहे. भारतीय दिखावेगिरी, भपकेबाजीत एक नंबर आले आहेत.
भारत हा तरुण देश आहे. यामुळे ऑटोमोबाईल असो की टेक क्षेत्र सर्वांच्याच नजरा भारतीय बाजारपेठेवर आहेत. अशातच आयटी, उद्योग आदींमुळे भारतीयांकडे पैसा खुळखुळू लागला आहे. यामुळे भारताने आणखी एका गोष्टीमध्ये जगात पहिला नंबर पटकावला आहे. यात खुश होण्यासारखे काही नाहीय. महागडे स्मार्टफोन खरेदीत भारतीयांचा पहिला नंबर लागत आहे.
खरेतर हा सर्व शोबाजीचा खेळ आहे. भारतीय दिखावेगिरी, भपकेबाजीत एक नंबर आले आहेत. आज स्मार्टफोन प्रत्येकाची गरज बनला आहे. परंतु, भारतात तो स्टेटस सिम्बॉलही आहे. यामुळे वार्षिक सरासरी कमाईमध्ये जगात १४२ व्या क्रमांकावर असलेला भारत महागडे फोन खरेदी करण्यात सर्वात पुढे गेला आहे.
महागड्या फोनची मागणी तशी चीन. आफ्रिका आणि लॅटीन अमेरिकेमध्ये सर्वाधिक आहे. परंतु भारत जागतिक बाजारपेठेत प्रिमिअम स्मार्टफोनच्या वाढत्या मागणीत सर्वात पुढे आहे. भारताचा प्रति व्यक्ती कमाई अंगोला देशापेक्षाही कमी आहे. अंगेलामध्ये एक व्यक्ती सरासरी 3205 डॉलर कमावतो. तर भारत 2601 डॉलर. तर अमेरिकेची हीच वार्षिक सरासरी 80,035 डॉलर आहे.
भारताला य़ा नंबरवर नेऊन ठेवण्यात अॅप्पल कंपनीचाही मोठा वाटा आहे. जवळपास २५ टक्के प्रिमिअम स्मार्टफोन विक्रीची बाजारपेठ या कंपनीने काबीज केलेली आहे. जगभरात गेल्या वर्षी प्रिमिअम स्मार्टफोनच्या बाजारातील अॅप्पलचा वाटा ७१ टक्के एवढा आहे. हुआवे मेट 60 स्मार्टफोन सीरीजमुळे अॅप्पलचा वाटा चार टक्क्यांनी घसरला आहे. दुसरा क्रमांक सॅमसंगचा आहे. जागतिक स्तरावर १७ टक्के वाटा सॅमसंगने घेतलेला आहे.