जयपूरच्या मुलाने अवघ्या 5 मिनिटांत दाखवली कमाल; इंस्टाग्रामने दिले 38 लाख रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 11:53 AM2022-09-20T11:53:54+5:302022-09-20T11:54:39+5:30
Instagram : रिपोर्टनुसार, जयपूरचा रहिवासी असलेल्या नीरज शर्माला हे 38 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. त्यांने करोडो युजर्सच्या अकाउंट्सचा गैरवापर होण्यापासून वाचविले आहे.
नवी दिल्ली : फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्रामने एका भारतीय मुलाला जवळपास 38 लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे. अॅपमधील त्रुटी शोधल्याबद्दल हे बक्षीस दिले आहे. रिपोर्टनुसार, जयपूरचा रहिवासी असलेल्या नीरज शर्माला हे 38 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. त्यांने करोडो युजर्सच्या अकाउंट्सचा गैरवापर होण्यापासून वाचविले आहे.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, नीरज शर्मा याने एक त्रुटी शोधली होती, ज्यामुळे कोणत्याही यूजरच्या अकाउंटच्या रीलची थंबनेल लॉगिन आणि पासवर्डशिवाय बदलली जाऊ शकते. या त्रुटीबद्दल नीरज शर्मा याने इन्स्टाग्राम आणि फेसबुकला माहिती दिली. त्यामुळे त्याला या कामासाठी सुमारे 38 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. नीरज शर्मा याने सांगितले की, रीलची थंबनेल बदलण्यासाठी फक्त मीडिया आयडीची आवश्यकता आहे. खातेधारकाचा पासवर्ड किती मजबूत आहे, हे महत्त्वाचे नाही.
याचबरोबर, फेसबुकला याबद्दल सांगितल्यानंतर 3 दिवसांनी नीरज शर्माला कंपनीकडून उत्तर मिळाले. कंपनीने त्याला डेमो दाखवण्यासही सांगितले. नीरज शर्माने अवघ्या 5 मिनिटांत थंबनेल बदलून दाखवली. त्यानंतर कंपनीने त्याचा रिपोर्ट मंजूर केला आणि त्याला 45,000 डॉलर (सुमारे 35 लाख रुपये) बक्षीस दिले. या प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे कंपनीने बोनस म्हणून 4500 डॉलर (सुमारे 3.5 लाख रुपये) बक्षीसही दिले.
दरम्यान, टेक कंपन्या बग्स किंवा त्रुटी शोधण्यासाठी बक्षीस देत राहतात. वेबसाइटवर सांगण्यात आले की, तुम्ही फेसबुक, मेसेंजर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर कंपनीशी संलग्न उत्पादनांमध्ये सुरक्षा बग्सची तक्रार करू शकता. तसेच, वेबसाइटवर स्पष्टपणे लिहिले आहे की, मेटाचे नियंत्रण नसलेल्या थर्ड पार्टी अॅप्स किंवा वेबसाइट्सची तक्रार करता येणार नाही. बाउंटी प्रोग्रामद्वारे सुरक्षा समस्येचा रिपोर्ट केल्यानंतर बक्षीस रक्कम, ही तुम्ही रिपोर्ट केलेला बग किती गंभीर आहे, यावर अवलंबून असेल. जर सुरक्षेचा मुद्दा फार गंभीर नसेल तर तुमची बक्षीस रक्कम कमी असेल. अशा प्रकारे तुम्ही कंपनीला बग्स कळवून पैसे कमवू शकता.