अॅप डाऊनलोड करण्यात भारतीय युजर्स आघाडीवर
By शेखर पाटील | Published: October 24, 2017 06:44 PM2017-10-24T18:44:23+5:302017-10-24T18:46:26+5:30
स्मार्टफोन अॅप डाऊनलोड करण्यात भारतीय युजर्स आघाडीवर असल्याचे अॅप अॅनी संस्थेच्या ताज्या आकडेवारीतून दिसून आले आहे. अॅप अॅनी या अॅप रिसर्च संस्थेने २०१७च्या तिसर्या तिमाहीतील (जुलै ते सप्टेबर) आकडेवारी नुकतीच जाहीर केली असून यात अनेक बाबी अधोरेखित झाल्या आहेत
स्मार्टफोन अॅप डाऊनलोड करण्यात भारतीय युजर्स आघाडीवर असल्याचे अॅप अॅनी संस्थेच्या ताज्या आकडेवारीतून दिसून आले आहे. अॅप अॅनी या अॅप रिसर्च संस्थेने २०१७च्या तिसर्या तिमाहीतील (जुलै ते सप्टेबर) आकडेवारी नुकतीच जाहीर केली असून यात अनेक बाबी अधोरेखित झाल्या आहेत. यात अँड्रॉइड प्रणालीसाठी असणारे गुगल प्ले स्टोअर आणि आयओएसचे अॅपल अॅप स्टोअरमधील एकत्रीत अॅप डाऊनलोडचा आकडा तब्बल २६ अब्ज इतका आहे. यात गेल्या तिमाहीत झालेले अॅप रिइन्स्टॉल आणि अपडेटच्या आकडेवारीचा समावेश नाही.
म्हणजेच यात संबंधीत तीन महिन्यात नव्याने झालेल्या अॅप डाऊनलोडचाच समावेश असून गेल्या वर्षीच्या याच कालखंडापेक्षा हा आकडा ८ टक्क्यांनी जास्त आहे. तर यातून गुगल आणि अॅपलसह संबंधीत अॅप विकसित करणार्यांना तब्बल १७ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न झालेले आहे. यातील बहुतांश डाऊनलोड हे चीनसारख्या मोठ्या राष्ट्रांमध्ये झाले आहेत. यानंतर आशियातील काही नव्याने उदयास येणार्या बाजारपेठांमध्ये (विशेष करून व्हिएतनाम, इंडिनेशिया आदी) झाल्याचे या आकडेवारीने सिध्द केले आहे. तथापि, गत तिमाहीत सर्वाधीक वाढ ही आग्नेय आशियातील राष्ट्रे व त्यातही भारतात झाल्याचे यातून दिसून येत आहे. यात अँड्रॉइड आणि आयओएस डाऊनलोडचा समावेश आहे. अर्थात भारतीय युजर्स अँड्रॉइड प्रणाली मोठ्या प्रमाणात वापरत असल्यामुळे साहजीकच या प्रणालीचे अॅप भारतात मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यात येतात. या आकडेवारीनेही यालाच अधोरेखित केले आहे.
२०१२ पर्यंत जगभरातील अॅप डाऊनलोडची संख्या २४० अब्ज तर याची उलाढाल १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होण्याचा अंदाज अॅप अॅनीने व्यक्त केला आहे. यात भारतीय बाजारपेठेचा मुख्य वाटा राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सप्टेबर महिन्यात रिलायन्सच्या जिओ सेवेने प्रारंभी मोफत आणि नंतर माफक दरात डाटा पॅकेजेस उपलब्ध केल्यामुळे अॅप डाऊनलोडचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आता अन्य कंपन्यांनीही किफायतशीर प्लॅन सादर केले आहेत. यातच आता जिओफोननंतर अन्य कंपन्यांनीही एकामागून एक स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याचा सपाटा लावल्यामुळे अॅपचा वापर वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.