Internet shutdown: आम्ही सज्ज, इंटरनेट होणार नाही बंद, भारताच्या टॉप सायबर अधिकाऱ्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 10:22 PM2018-10-12T22:22:20+5:302018-10-12T22:26:06+5:30
पुढच्या 48 तासांत इंटरनेट सेवा ठप्प होणार असल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली- पुढच्या 48 तासांत इंटरनेट सेवा ठप्प होणार असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. परंतु भारताच्या इंटरनेट सुरक्षेशी संबंधित असलेल्या अधिका-यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षा अधिकारी गुलशन राय यांच्या मते, जगभरात जरी इंटरनेट सेवा खंडित झाली तरी भारतात इंटरनेटच्या माध्यमातून होणारी कामं सुरूच राहणार आहेत. यासाठी आधीच व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
राष्ट्रीय सायबर सुरक्षातज्ज्ञ अधिकारी गुलशन राय यांनी NDTVच्या हवाल्यानं सांगितलं की, जगभरातल्या इंटरनेट धारकांना पुढच्या 48 तासांमध्ये नेटवर्क कनेक्शनचा समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. परंतु आम्ही याची पूर्ण तयारी केली आहे. इंटरनेट बंद झाले तरी भारतात अशी कोणतीही समस्या उद्भवणार नाही. Russia Today रिपोर्टनुसार, द इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड अँड नंबर्स(ICANN)ही संस्था मेंटनन्सशी संबंधित काम करणार आहे. ICANN क्रिप्टोग्राफिक की(key) बदलणार आहे. ही इंटरनेट की(key)च अॅड्रेस बुक आणि डोमेन नेम सिस्टम(DNS)ची सुरक्षा करणार आहे.
या मेंटनन्समुळे पूर्ण जगभरात फक्त 1 टक्के म्हणजेच जवळपास 36 मिलियन(3.6 कोटी) लोक प्रभावित होणार आहेत. कम्युनिकेशन रेग्युलेटरी अथॉरिटीच्या मते, डोमेन नेम सिस्टीमच्या सुरक्षेसाठी जगभरातील इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद करणं गरजेचं आहे. जे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तयार नाहीत. त्यांच्या ग्राहकांना याचा फटका बसू शकतो. या परिस्थितीत सिस्टम सिक्युरिटी एक्सटेन्शन बनवून मार्ग काढला जाऊ शकतो.