तासाभरानंतर Facebook, Instagram ची सेवा पूर्ववत, अचानक लॉग आऊट झाल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 23:07 IST2024-03-05T23:06:03+5:302024-03-05T23:07:08+5:30
Instagram, Facebook services resume after outage : फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने लाखो यूजर्स हैराण झाले.

तासाभरानंतर Facebook, Instagram ची सेवा पूर्ववत, अचानक लॉग आऊट झाल्याने खळबळ
Instagram, Facebook services resume after outage : सोशल मीडियातील मेटा प्लॅटफॉर्मच्या अनेक सेवा जगभरात ठप्प झाल्या आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्राम एक तासापेक्षा जास्त काळ काम करत नव्हते. युजर्सचे अकाऊंट आपोआप लॉग आऊट झाले. त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. लाखो युजर्सनी ट्विटरवरून आणि इतर प्लॅटफॉर्मवरून याबद्दल तक्रार केली.
आता मेटाच्या सेवा आता हळूहळू काम करू लागल्या आहेत. यामध्ये फेसबुक सुद्धा सुरु झाले आहे, तर इन्स्टाग्राम अद्याप पूर्णपणे सुरु झालेले नाही. तसेच, अचानक सेवा ठप्प का झाल्या? याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम मंगळवारी अचानक जगभर ठप्प झाले होते. लॉग आऊट झाल्यानंतर युजर्सना लॉग इन करताच येत नसल्याचे दिसून आले. भारतीय वेळेनुसार अंदाजे रात्री ८ वाजून ५२ मिनिटांनी ठप्प झाले.
फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने लाखो यूजर्स हैराण झाले. अचानक फेसबुक मधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा लॉगिन करण्यास अडथळे येत असल्याने एकमेकांकडे चौकशीही करण्यात आली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर #facebookdown ट्रेंडिंग सुरू झाले. युजर्स त्यांच्या तक्रारींसोबतच मजेशीर प्रतिक्रियाही देताना दिसले. प्रत्येकालाच अडचण येत असल्याने सर्वरचा काही प्रॉब्लेम असेल असा विचार करून युजर्सनी या क्षणाचा मीम्सच्या माध्यमातून आनंद घेतला. तर रशियन हॅकर्स, ब्रिज ऑफ ट्रस्ट, का डिजिटल वॉर याबाबत सायबर तज्ज्ञ आडाखे बांधत आहेत.