इन्स्टाग्राम युजर्सला आपल्या मित्रांसह करता येणार लाईव्ह स्ट्रीमिंग
By शेखर पाटील | Published: October 26, 2017 08:14 AM2017-10-26T08:14:36+5:302017-10-26T08:20:16+5:30
इन्स्टाग्रामने युजर्सला आपल्या मित्रांसह लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचे नाविन्यपूर्ण फिचर प्रदान केले आहे.
इन्स्टाग्रामने युजर्सला आपल्या मित्रांसह लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचे नाविन्यपूर्ण फिचर प्रदान केले आहे. इन्स्टाग्रामने एका ब्लॉगपोस्टच्या माध्यमातून आपल्या या नवीन फिचरबाबत माहिती दिली आहे. यानुसार इन्स्टाग्रामचा वापर करणार्या युजर्सला आता लाईव्ह स्ट्रीमिंग करत असतांना आपल्या मित्रांना यात समाविष्ट करता येणार आहे.
लाईव्ह असताना कुणीही ते पाहणार्या मित्राला अॅड या बटनावर क्लिक करून यात सहभागी करू शकतात. यामुळे स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर पिक्चर-इन-पिक्चर या पध्दतीने संबंधीत युजर आणि त्याचा मित्र एकमेकांना पाहू शकतील. (इतरांनाही ते तसेच दिसेल) यात लाईव्ह असणारा व्यक्ती वरील बाजूस तर समोरचा युजर खालील बाजूस दिसेल. विशेष बाब म्हणजे हे फिचर वापरणारा युजर समोरच्या व्यक्तीला कोणत्याही क्षणी लाईव्ह स्ट्रीमिंगमधून काढू शकतो. तसेच तो नवीन युजरला अॅडदेखील करू शकतो. अन्य युजर्स या सर्व लाईव्ह व्हिडीओला लाईक/कॉमेंट करू शकतात.
हा लाईव्ह व्हिडीओ संपल्यानंतर संबंधीत युजर आपल्या स्टोअरीजवर (२४ तासांसाठी) वापरू शकतो. अन्यथा हा व्हिडीओ तातडीने नष्टदेखील करता येतो. लाईव्ह स्ट्रीमिंग करणार्या युजर्सच्या स्टोरीज बारमधील गोलाकार चित्रासमोर दोन डॉट दिसतील. यावर कुणीही क्लिक केल्यावर ते स्ट्रीमिंग पाहून त्यावर कॉमेंट करू शकतो.
गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात इन्स्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याची सुविधा देण्यात आली होती. याला युजर्सचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला असतांना आता याचा विस्तार करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटींग सिस्टीमसाठी सादर करण्यात येणार असल्याचे इन्स्टाग्रामने जाहीर केले आहे.
(छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम ब्लॉग)