इन्स्टाग्राम स्टोरीज ठरल्या सुपरहिट !
By शेखर पाटील | Published: August 3, 2017 08:39 PM2017-08-03T20:39:58+5:302017-08-03T20:55:38+5:30
इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर स्टोरीज या फिचरला एक वर्ष पूर्ण होत असतांना हे फिचर युजर्सच्या चांगल्याच पसंतीस उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.
इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर स्टोरीज या फिचरला एक वर्ष पूर्ण होत असतांना हे फिचर युजर्सच्या चांगल्याच पसंतीस उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.
एक वर्षापुर्वी इन्स्टाग्राम या अॅपवर स्टोरीज हे फिचर देण्यात आले होते. अर्थातच ही स्नॅपचॅट या विशेष करून टिनएजर्समध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणार्या अॅपची हुबेहूब नक्कल होती. यामुळे प्रारंभी इन्स्टाग्राम आणि पर्यायाने याची मालकी असणार्या फेसबुकची खिल्लीदेखील उडविण्यात आली होती. मात्र हळूहळू इन्स्टाग्राम स्टोरीजने बाळसे धरले आणि आज एक वर्षानंतर हे फिचर अक्षरश: सुपरहिट ठरल्याचे दिसून येत आहे.
स्नॅपचॅटवर कुणीही समोरील युजरला नष्ट होणारा संदेश/प्रतिमा/व्हिडीओ पाठवू शकतो. समोरच्या व्यक्तीने याला पाहिल्यानंतर संबंधीत संदेश/प्रतिमा/व्हिडीओ नष्ट होतात. यात कोणत्याही स्वरूपाचा डिजीटल पुरावा मागे राहत नसल्यामुळे कुमारवयीन युजर्समध्ये याचा वापर विपुल प्रमाणात वाढला आहे. याचप्रमाणे इन्स्टाग्रामनेही स्टोरीज हे फिचर दिले. यात युजरने स्टोरीजच्या माध्यमातून शेअर केलेली प्रतिमा २४ तासानंतर नष्ट होण्याची सुविधा देण्यात आली. यानंतर यात व्हिडीओचा समावेशदेखील करण्यात आला. इन्स्टाग्रामच्या स्टोरीज या फिचरमध्ये विविध फिल्टर्सच्या माध्यमातून सुशोभित केलेल्या प्रतिमा आणि व्हिडीओजचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. याला युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आज एका वर्षानंतर इन्स्टाग्रामच्या एकंदरीत युजर्सपैकी सुमारे २५ कोटी वापरकर्ते स्टोरीज वापरत आहेत. प्रत्येक पंचविशीच्या आतील इन्स्टाग्राम युजर हा दिवसाला सरासरी ३२ मिनिटे लॉगीन करतो. तर अन्य वयोगटातील लोक सरासरी २४ मिनिटे प्रति दिवस याचा वापर करतात. यातील बहुतांश वेळ स्टोरीज वर जात असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. अर्थात इन्स्टाग्राम स्टोरीजनेच स्नॅपचॅटला मागे टाकल्याचे दिसून येत आहे. आता व्यावसायिक पातळीवरूनही स्टोरीज विपुल प्रमाणात वापरण्यात येत असल्याचे इन्स्टाग्रामतर्फे जाहीर करण्यात आले आहे. विशेष करून अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना त्यांनी वाचल्यानंतर नष्ट होणारा संदेश पाठविण्याला प्राधान्य देत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
स्नॅपचॅट या अॅपच्या वाढत्या लोकप्रियतेचा फेसबुकने मध्यंतरी अक्षरश: धसका घेतला होता. यामुळे याला मात देण्यासाठी फेसबुकने आपल्या मालकीच्या सर्व सेवांमध्ये याचे फिचर कॉपी करण्याचा सपाटा लावला. यात फेसबुकची मालकी असणार्या फेसबुक मॅसेंजर, इन्स्टाग्राम, व्हाटसअॅप आदींमध्ये विविध स्वरूपात नष्ट होणार्या संदेशांची सुविधा देण्यात आली आहे. खुद्द फेसबुकवर स्टोरीज वापरण्याची सुविधा काही महिन्यांपुर्वी देण्यात आली आहे. यात आता इन्स्टाग्रामवर हे फिचर सुपरहिट झाल्याने या कॉपी केल्याचे काही प्रमाणात तरी सार्थक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.