इंटेक्सचा जंबो बॅटरीयुक्त स्मार्टफोन
By शेखर पाटील | Published: December 13, 2017 12:32 PM2017-12-13T12:32:59+5:302017-12-13T12:34:49+5:30
इंटेक्स कंपनीने ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असणारा इएलवायटी इ६ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.
अलीकडे बहुतांश कंपन्या ग्राहकांची आवश्यकता लक्षात घेत चांगली बॅटरी असणारे स्मार्टफोन सादर करत आहेत. यात आता इंटेक्स कंपनीच्या इएलवायटी इ६ या मॉडेलची भर पडली आहे. वर नमूद केल्यानुसार यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून ती मल्टी-टास्कींग करूनदेखील दीर्घ काळापर्यंत चालत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. याच्या माध्यमातून वापरानुसार ८ ते १६ तासांइतका बॅकअप तर १२ दिवसांपर्यंतचा स्टँडबाय टाईम मिळत असल्याचा दावादेखील करण्यात आला आहे.
इंटेक्स इएलवायटी इ६ या स्मार्टफोनमध्ये ५ इंच आकारमानाचा व एचडी क्षमतेचा (१२८० बाय ७२० पिक्सल्स) २.५ डी डिस्प्ले देण्यात आला असून यावर ड्रॅगनटेल ग्लासचे संरक्षक आवरण असेल. मीडियाटेकच्या क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. याचे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील मुख्य कॅमेरा १३ तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असून दोन्ही बाजूने एलईडी फ्लॅश देण्यात आलेला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे. इंटेक्स इएलवायटी इ६ हा स्मार्टफोन ग्राहकांना ६,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला असून १५ डिसेंबरपासून याची फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून विक्री सुरू होणार आहे.