आयबॉलचा वायरलेस टीव्ही हेडसेट दाखल
By शेखर पाटील | Published: July 11, 2018 01:33 PM2018-07-11T13:33:38+5:302018-07-11T13:35:40+5:30
विविध उपकरणांच्या उत्पादनातील अग्रगण्य नाव म्हणून गणल्या जाणार्या आयबॉल कंपनीने आता वायरलेस कनेक्टीव्हिटी असणारा टिव्ही हेडसेट भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.
विविध उपकरणांच्या उत्पादनातील अग्रगण्य नाव म्हणून गणल्या जाणार्या आयबॉल कंपनीने आता वायरलेस कनेक्टीव्हिटी असणारा टीव्ही हेडसेट भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे. वायरलेस कनेक्टीव्हिटी असणारे हेडसेट सध्या भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय झाले आहेत. यात अगदी किफायतशीर मूल्यापासून ते उच्च श्रेणीतील मॉडेल्स विविध कंपन्यांनी लाँच केले आहेत. या हेडसेटला स्मार्टफोनसह अन्य उपकरणांशी जोडता येते. आयबॉलने मात्र यापेक्षा थोडा भिन्न मार्ग चोखाळत खास टिव्हीसाठी वायरलेस हेडसेट बाजारपेठेत उतारला आहे. अनेकदा आपल्याला घरात वा कार्यालयात इतरांना डिस्टर्ब न करता टिव्ही पाहण्याची गरज भासते. यासाठी हा हेडसेट उपयुक्त ठरणार आहे. यात दोन स्वतंत्र उपकरणे आहेत.
यात युएसबीच्या स्वरूपातील ऑडिओ ट्रान्समीटर आहे. हा ट्रान्समीटर टीव्हीला कनेक्ट करावा लागतो. अर्थात टीव्हीतील ध्वनीला परिसरात १० मीटरपर्यंत प्रक्षेपित करण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. तर यासोबत असणार्या हेडसेटमध्ये रिसिव्हर बसविण्यात आला आहे. टिव्हीशी कनेक्ट असणार्या ऑडिओ ट्रान्समीटरमधून प्रक्षेपित केलेला ध्वनी या हेडसेटमधील रिसिव्हरच्या माध्यमातून ऐकता येतो. हे हेडसेट स्मार्टफोनलाही कनेक्ट करता येणार आहे.
आयबॉलच्या वायरलेस टीव्ही हेडसेटची डिझाईन ही युजरला आरामदायक ठरणारी आहे. यासाठी उत्तम दर्जाचे कुशन वापरण्यात आले आहे. हा हेडसेट अॅडजस्ट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच तो सुलभ पद्धतीत फोल्ड करता येतो. याच्या इयरकपवर रिमोट कंट्रोल प्रदान करण्यात आले आहे. यामध्या ध्वनी कमी-जास्त वा पॉज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये इनबिल्ट मायक्रोफोनदेखील देण्यात आला आहे. याच्या मदतीने स्मार्टफोनवरून कॉल करणे अथवा रिसिव्ह करणे शक्य आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा हेडसेट वायरलेससह वायर्ड पद्धतीतही वापरता येणार आहे. अर्थात यासाठी ऑक्झ-इन पोर्टचा वापर करावा लागणार आहे. हे मॉडेल ब्लॅक आणि डार्क सिल्व्हर या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना २,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करता येणार आहे.