मायक्रोसॉफ्टचे सरफेस बुक 2 भारतात सादर
By शेखर पाटील | Published: August 8, 2018 07:25 AM2018-08-08T07:25:27+5:302018-08-08T07:29:27+5:30
मायक्रोसॉफ्टने आपले सरफेस बुक 2 हे उच्च श्रेणीतील लॅपटॉपचे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तम फिचर्स आहेत.
मायक्रोसॉफ्टने आपले सरफेस बुक २ हे उच्च श्रेणीतील लॅपटॉपचे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तम फिचर्स आहेत. मायक्रोसॉफ्टने गत वर्षी सरफेस बुक २ हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली होती. आता याला भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहे. हे टु-इन-वन या प्रकारातील मॉडेल असल्यामुळे याला लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणार आहे. या मॉडेल सोबत सरफेस पेनही वापरता येणार आहे. मायक्रोसॉफ्ट सरफेस बुक २ हा लॅपटॉप १३.५ आणि १५ इंच आकारमानाच्या डिस्प्लेमध्ये सादर करण्यात आला आहे. यातील १३.५ इंची मॉडेलमध्ये ३००० बाय २००० पिक्सल्स क्षमतेचा तसेच पिक्सलसेन्स या प्रकारचा डिस्प्ले असेल. तर १५ इंची मॉडेलमध्ये ३४०० बाय २००० पिक्सल्स क्षमतेचा पिक्सलसेन्स या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. याच्या विविध व्हेरियंटमध्ये सातव्या पिढीतील कोअर आय-५ आणि आठव्या पिढीतील कोअर आय-७ हे अत्यंत गतीमान प्रोसेसर देण्यात आले आहेत. याशिवाय यात एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स १०५० आणि जीटीएक्स १०६० हे ग्राफीक्स प्रोसेसर असतील. यातील विविध व्हेरियंटच्या रॅम ८ आणि १६ जीबी असतील. तर स्टोअरेजसाठी २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १ टिबी असे पर्याय देण्यात आले आहेत.
सरफेस बुक २ या लॅपटॉपमधील बॅटरी तब्बल १७ तासाचा बॅकअप देत असल्याचा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा दावा आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. तर यात डॉल्बी ऑडिओ प्रिमीअमयुक्त स्पीकर व दोन मायक्रोफोनही आहेत. यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ आणि एक्सबॉक्स वायरलेसचा इनबिल्ट सपोर्ट दिला आहे. यासोबत दोन युएसबी ३.० टाईप-ए पोर्ट, एक युएसबी टाईप-सी पोर्ट, कार्ड रीडर, हेडफोन जॅक आदी फिचर्सही आहेत. तसेच यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, मॅग्नेटोमीटर व अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील देण्यात आले आहेत. सरफेस बुक २ हा लॅपटॉप ६४ बीट विंडोज १० या प्रणालीवर चालणारा असेल. यात मायक्रोसॉफ्टचे सर्व प्रॉडक्टिव्हिटी टुल्स वापरता येतील. याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य १,३७,९९९ रूपयांपासून सुरू होणारे असून सर्वात हाय व्हेरियंटचे मूल्य २,९५,९९९ रूपये आहे. हा लॅपटॉप ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे.