मुलगा डॉक्टर की इंजिनीअर? केवळ २० मिनिटांत कळणार मेंदूची क्षमता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 10:40 AM2023-06-19T10:40:15+5:302023-06-19T10:41:16+5:30
मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने तयार केलेल्या ब्रेन मॅपिंग विशेष सॉफ्टवेअर मशीनद्वारे हे शक्य होणार आहे.
नवी दिल्ली : आता केवळ २० मिनिटांत मुलाच्या शिकण्याची क्षमता किती आहे हे कळणार आहे. तो मेंदूवर नियंत्रण ठेवू शकतो का, याचसह त्याने कोणत्या क्षेत्रात करिअर करायला हवं हेही आता एका समजणार आहे. मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने तयार केलेल्या ब्रेन मॅपिंग विशेष सॉफ्टवेअर मशीनद्वारे हे शक्य होणार आहे. यावर २०१७ पासून संशोधन सुरू होते. या सॉफ्टवेअरद्वारे मुलांच्या क्षमता तपासण्यास मोठी मदत होणार आहे.
सात हजार जणांवर प्रयोग
मध्य प्रदेशातील ७ हजार लोकांवर या तंत्राचा अवलंब केला आहे. त्यात कर्करोग, पक्षाघात, बायपोलर डिसऑर्डर (मानसिक विकार) अशा गंभीर समस्या असलेल्या लोकांचाही समावेश करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या समस्या सुटण्यास मदत झाली आहे.
ब्रेन वेव्ह...: मेंदूच्या लहरींचे विश्लेषण हे एक नवीन तंत्रज्ञान आहे, जे मेंदूचे वाचन आणि मानसिक विकार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. हे तंत्रज्ञान पाच वर्षांच्या मुलापासून ते ९० वर्षांच्या वृद्धापर्यंत काम करते.
मेंदूवर कसे काम करते?
अल्फा लहरी : मेंदूवरील नियंत्रण, विचारांमधील संतुलन किती आहे हे सांगते
बीटा लहरी : शिकण्याची, समजून घेण्याची क्षमता, स्मरणशक्ती इ.बद्दल सांगते.
गामा लहरी : राग, मूड बदलणे, अस्वस्थता यासारखे विकार यातून आढळतात.
थीटा लहरी : विचार प्रक्रिया करते, भावना स्पष्ट करते.
डेल्टा लहरी : झोपेची गुणवत्ता, समाधान याबद्दल सांगते.