हा आहे 26 लाखांचा iPhone X, पाहा काय आहे या फोनमध्ये खास?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 06:22 PM2017-11-21T18:22:09+5:302017-11-21T18:30:15+5:30
सध्या मोबाइल मार्केटमध्ये अॅपल कंपनीच्या आयफोन-X स्मार्टफोनची जोरात चर्चा सुरु आहे. गेल्या तीन नोव्हेंबरला आयफोन-X मार्केटमध्ये व्रिक्रीसाठी दाखल झाला. त्यानंतर या स्मार्टफोनला ग्राहकांनी सुद्धा पसंती दर्शविली होती.
नवी दिल्ली : सध्या मोबाइल मार्केटमध्ये अॅपल कंपनीच्या आयफोन-X स्मार्टफोनची जोरात चर्चा सुरु आहे. गेल्या तीन नोव्हेंबरला आयफोन-X मार्केटमध्ये व्रिक्रीसाठी दाखल झाला. त्यानंतर या स्मार्टफोनला ग्राहकांनी सुद्धा पसंती दर्शविली होती. दरम्यान, यामध्ये आता Caviar या नावाच्या कंपनीने आयफोन-Xचे एक आवृत्ती लॉंच केली आहे. याचे नाव आयफोन-X एम्पिरिअल क्राउन असे ठेवले आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनची किंमत 26,28,400 रुपये इतकी आहे.
आयफोन-X एम्पिरिअल क्राउनच्या रिअर पॅनेलमध्ये सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. तसेच, यामध्ये वेग-वेगळ्या आकाराचे 344 हून अधिक हिरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय सोन्याचा गरुड पक्षाचा चेहरा लावण्यात आला आहे. या स्मार्टफोनमधील फीचर्स आयफोन-X सारखेच असणार आहेत.
Caviar स्मार्टफोन कस्टमाइज करुन विकणारी कंपनी आहे. आयफोन एक्स शिवाय कंपनीने आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस स्मार्टफोन सुद्धा कस्टमाइज करण्यात आले आहेत. याचबरोबर, आपल्याला आठवत असेलच की या वर्षाच्या सुरुवातील नोकिया 3310 या स्मार्टफोनची सुद्धा पुतीन-ट्रम्प अशा प्रकारची आवृत्ती सुद्धा या कंपनीने आणली होती.
आयफोन-X या मॉडेलमध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहेत. यातील काही महत्वाचे फिचर्स खालीलप्रमाणे आहेत.
१) फेस आयडी: आयफोन-X मधील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे फेस आयडी होय. ही प्रणाली लवकरच जगातील सर्व पासवर्डचे स्थान घेण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. याचा अचूक वापर करण्यासाठी अॅपलने आयफोन-X मध्ये फ्रंट कॅमेर्याच्या ठिकाणी ट्रु-डेप्थ कॅमेरा सिस्टीम दिलेली आहे. यात कॅमेर्यांसह विविध सेन्सरच्या मदतीने युजरच्या चेहर्याचे अचूक मापन करण्याची सुविधा असेल. यात मशिन लर्नींगचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामुळे युजरचे वय वाढणे वा अन्य वयोमानानुसार बदल झाले तरी ही प्रणाली काम करेल. युजरने चष्मा लावला, टोपी घातली वा दाढी-मिशी वाढवली/कापली तरीही स्मार्टफोन लॉक/अनलॉक होऊ शकतो. इन्फ्रारेडचा वापर केल्यामुळे अंधारातही याचा वापर करता येतो. महत्वाची बाब म्हणजे फेस आयडीचा वापर करून कुणीही अॅपल-पे आणि इतर थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करून पैशांची देवाण-घेवाण करू शकतो.
२) अॅनिमोजी: आयफोन-X मॉडेलमध्ये असणार्या ट्रु-डेप्थ कॅमेरा सिस्टीमचा अन्य भन्नाट वापर अॅनिमोजीच्या माध्यमातून युजरला करता येणार आहे. यामध्ये युजरचा मूड आणि हावभावांना अचूकपणे टिपून त्याच्याशी संबंधीत इमोजी तयार करता येणार आहे. या इमोजीचे आदान-प्रदानदेखील करण्याची सुविधा दिलेली आहे.
३) अद्ययावत पोर्ट्रेट मोड: काही स्मार्टफोनच्या कॅमेर्यांमध्ये पोर्ट्रेट मोड देण्यात आलेला असतो. आयफोन-X या मॉडेलमध्ये मुख्यच नव्हे तर सेल्फी कॅमेर्यातही ही सुविधा दिलेली आहे. याच्या मदतीने उत्तम दर्जाचे पोर्ट्रेट या प्रकारातील प्रतिमा घेता येणार आहे. यात अंधारामध्ये लाईटींग इफेक्ट देण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आलेली आहे.
४) दर्जेदार कॅमेरा: आयफोन-X च्या मागील बाजूस १२ मेगापिक्सल्सच्या ड्युअल कॅमेर्यांचा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये ड्युअल ऑप्टीकल स्टॅबिलायझेशनची सुविधा असेल. यात दर्जेदार प्रतिमांसाठी विविध फिचर्स असतील. तर व्हिडीओ चित्रीकरण करतांना नॉइस रिडक्शनची सुविधाही यात असेल.
५) वायरलेस चार्जींग: आयफोन-X मध्ये क्युआय या मानकावर आधारित वायरलेस चार्जींगची सुविधा देण्यात आली आहे. ही प्रणाली अन्य कंपन्यांच्या मॉडेलमध्येही असली तरी अॅपलने यासाठी एकदचा अनेक उपकरणांना चार्ज करण्यासाठी स्वतंत्र मॅट सादर केली आहे.
६) उत्तम बॅटरी: आयफोन-X या मॉडेलमध्ये आयफोन ७ पेक्षा दोन तास जास्त बॅकअप देणारी बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. मल्टी-टास्कींगच्या आजच्या युगात बॅटरी हा महत्वाचा घटक असल्यामुळे हे फिचरदेखील युजर्सला लाभदायक ठरणारे असेल.
७) बायोनिक चीपसेट: आयफोन-X मध्ये ६४ बीट सिक्स-कोअर ए ११ ही बायोनिक चीप देण्यात आली आहे. अॅपलच्या आधीच्या ए १० या चीपपेक्षा ती अधिक गतीमान असेल.
८) बांधणी: आयफोन-X मॉडेलची बांधणी अतिशय मजबूत मात्र अत्यंत आकर्षक अशीच असेल. याच्या पुढील व मागील बाजूस मजबूत काचेचे आवरण असून मुख्य फ्रेम ही स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेली असेल.
९) होम बटनचा त्याग: आयफोन-X या मॉडेलमध्ये होम बटन नसेल. याऐवजी युजरच्या हाताच्या हालचालींनी तो डिस्प्लेवर हवे ते सुलभपणे पाहू शकतो. यात खालून वर स्वाईप केल्यास होम स्क्रीन येऊ शकतो. याच पध्दतीने विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करता येते.
१०) सुपर रेटीना डिस्प्ले: आयफोन-X च्या माध्यमातून अॅपलने पहिल्यांदा ऑर्गेनिक लाईट एमिटींग डायोड या प्रकारातील डिस्प्लेचा अवलंब केला आहे. तसेच यातील ५.८ इंची डिस्प्ले हा सुपर रेटीना या प्रकारातील असेल. यात ट्रु-टोन हे विशेष फिचर आहे. याच्या मदतीने कोणत्याही वातावरणात डिस्प्लेचा तापमान आणि रंगसंगती कायम ठेवणे शक्य होणार आहे.