वर्ष झाले, एअरटेल, जिओ 5G ची मजल कुठपर्यंत गेली? महागडी रिचार्ज आणणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 02:23 PM2023-10-03T14:23:56+5:302023-10-03T14:24:35+5:30
Airtel, Jio 5G Coverage: लवकरच कंपन्या ५जी साठी वेगळे पॅक किंवा रिचार्ज महाग करण्याची शक्यता आहे. असे असले तरी गावा गावात अद्याप फाईव्ह जीची सेवा पोहोचलेली नाहीय.
देशात फाईव्ह जी सेवा सुरु होऊन आता एक वर्ष झाले आहे. एअरटेलने सर्वात आधी 5G सेवा लाँच करत जिओला मागे टाकले होते. तसेच दोन्ही कंपन्यांनी सुरुवातीला ४जी च्या पॅकमध्येच ५जी सेवा देण्यास सुरुवात केली होती. सुमारे वर्षभर ही सेवा ४जी च्या पॅकवरच मिळेल म्हणजेच मोफत मिळेल असे सांगितले जात होते. परंतू, आजही ही सेवा ट्रायलच्या नावाखाली मोफत दिली जात आहे.
लवकरच कंपन्या ५जी साठी वेगळे पॅक किंवा रिचार्ज महाग करण्याची शक्यता आहे. असे असले तरी गावा गावात अद्याप फाईव्ह जीची सेवा पोहोचलेली नाहीय. भारतात सर्वात आधी ५जी सेवा लाँच करणाऱ्या एअरटेलची मजल कुठपर्यंत गेलीय? जिल्हा पातळीवर आहे की तालुका पातळीवर?
या काळात एअरटेलने 50 दशलक्षाहून अधिक ५ जी ग्राहक जोडले आहेत. तसेच देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये एअरटेल फाईव्ह जीचे नेटवर्क मिळू लागले आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग आणि VSAT द्वारे जोडलेले लक्षद्वीप बेट याठिकाणी फक्त ही सेवा उपलब्ध नाहीय.
जिओची देखील तालुका पातळीवर फाईव्ह जी सेवा सुरु झाली आहे. अद्याप तालुक्यांतील छोटी छोटी शहरे, गाव, बाजारपेठा आदी ठिकाणी फाईव्ह जी सेवा मिळत नाहीय. म्हणजेच दोन्ही कंपन्यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.
जिओ, एअरटेलने किती शहरांत सेवा सुरु केलीय?
Jio आणि Airtel आज एकत्रितपणे 10,000 शहरांना त्यांच्या ‘True 5G’ आणि ‘5G Plus’ नेटवर्कसह सेवा देण्यास सुरुवात केली आहे. अद्याप छोटी शहरे, गावे फाईव्ह जी नेटवर्कच्या परिघात येणे बाकी आहे. कदाचित ही शहरे, गावे व्यापल्यानंतर या दोन्ही कंपन्या फाईव्ह जी रिचार्ज लाँच करण्याची शक्यता आहे.