Jio 5G : आणखी २७ शहरांमध्ये सुरु होणार जियोची 5G सेवा; आतापर्यंत देशभरात ३३१ शहरांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 09:14 PM2023-03-08T21:14:40+5:302023-03-08T21:15:09+5:30
Jio 5G : कंपनीच्या निवेदनानुसार, ८ मार्च २०२३ पासून या २७ शहरांमध्ये जिओ वापरकर्त्यांना 'वेलकम ऑफर' दिली जाईल.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने बुधवारी १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आणखी २७ शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. यासह, जिओने आतापर्यंत देशातील ३३१ शहरांमध्ये 5G सेवांचा विस्तार केला आहे.
यासंदर्भात कंपनीने एका निवेदनाद्वारे माहिती दिली. 'Jio True 5G' आता आंध्र प्रदेश, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल, यासारख्या राज्यांमधील २७ शहरांमध्ये उपलब्ध आहे.
कंपनीच्या निवेदनानुसार, ८ मार्च २०२३ पासून या २७ शहरांमध्ये जिओ वापरकर्त्यांना 'वेलकम ऑफर' दिली जाईल. या अंतर्गत, कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 1 जीबीपीएसपर्यंतच्या वेगाने अमर्यादित डेटा मिळू शकतो. दरम्यान, यापूर्वी कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती की, २०२३ च्या अखेरीस जिओची 5G सेवा देशभरात पसरेल.
5G नेटवर्क दोन प्रकारे काम करते
5G नेटवर्क भारतात दोन प्रकारे काम करते. यामध्ये जिओ स्टँड अलोन 5G नेटवर्कवर काम करते, तर एअरटेल नॉन स्टँड अलोन नेटवर्कवर काम करते. नॉन स्टँड अलोन नेटवर्कमध्ये फक्त 4G टॉवर अपग्रेड केले जाते, तर स्टँड अलोनमध्ये 4G टॉवरची मदत घेतली जात नाही. म्हणजेच स्वतंत्र टॉवर असतो. हेच कारण आहे की, Jio चे 5G इंटरनेट Mi 10 आणि Mi 10i स्मार्टफोनमध्ये काम करू शकणार नाही. या दोन्ही स्मार्टफोन्सना 5G स्टँड अलोन किंवा 5G SA सॉफ्टवेअर दिलेले नाही.