TRAI ची मोठी कारवाई! १.७७ कोटी सिमकार्ड ब्लॉक, बनावट कॉल्स-मेसेजेसला आळा बसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 10:05 AM2024-11-12T10:05:53+5:302024-11-12T10:06:49+5:30
DoT blocks 1.77 crore SIM cards : देशातील १२२ कोटींहून अधिक दूरसंचार युजर्सच्या सुरक्षेसाठी दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सहकार्याने हे पाऊल उचलले आहे.
नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार विभागाने बनावट कॉल्स रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. अलीकडेच विभागाने १.७७ कोटी मोबाईल नंबर बंद केले आहेत. हे नंबर बनावट कॉल करण्यासाठी वापरले जात होते. देशातील १२२ कोटींहून अधिक दूरसंचार युजर्सच्या सुरक्षेसाठी दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सहकार्याने हे पाऊल उचलले आहे.
दूरसंचार विभाग आणि ट्रायने संयुक्तरित्या बनावट कॉल्सविरोधात कारवाई तीव्र केली आहे. ट्रायने गेल्या महिन्यातच एक नवीन धोरण तयार केले आहे, ज्याद्वारे आता ऑपरेटर स्वत:च मार्केटिंग आणि बनावट कॉल्स थांबवू शकतात. यामुळे आता व्हॉईसलिस्टिंगची गरज भासणार नाही.
दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, दररोज जवळपास १.३५ कोटी बनावट कॉल्स थांबवले जात आहेत. याशिवाय, विभागाने बनावट कॉल करणारे १.७७ कोटी मोबाईल नंबर बंद केले आहेत. लोकांच्या तक्रारींवर विभागाने कारवाई करत पाच दिवसांत सुमारे ७ कोटी कॉल्स बंद केले आहेत. ही आपल्या मोहिमेची सुरुवात असल्याचे विभागाने म्हटले आहे.
बनावट कॉल्सवर आळा बसेल
दूरसंचार विभागाने बनावट कॉल करणाऱ्यांना रोखण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही विभागाने लाखो सिमकार्ड बंद केले होते. बनावट कॉल्स रोखण्यासाठी विभाग कठोर पावले उचलत आहे. तसेच, आतापासून, कॉलर्सना फक्त व्हाइटलिस्ट असलेले टेलीमार्केटिंग कॉल प्राप्त होतील.
११ लाख खाती गोठवण्यात आली
अलीकडेच, दूरसंचार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, जवळपास ११ लाख खाती बँकांनी आणि पेमेंट वॉलेटद्वारे गोठवली आहेत. येत्या काही दिवसांत आणखी सिमकार्ड ब्लॉक केले जातील, असे सरकारचे म्हणणे आहे. दूरसंचार विभाग (DOT) सोबत काम करणाऱ्या चार दूरसंचार सेवा ऑपरेटरने (TSPs) ४५ लाख बनावट आंतरराष्ट्रीय कॉल्स दूरसंचार नेटवर्कपर्यंत पोहोचण्यापासून रोखले होते.