Jio ला मोठा धक्का! किमतीत वाढ झाल्याने युजर्संनी सोडली साथ; 'या' कंपनीची झाली चांदी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 04:38 PM2022-02-17T16:38:46+5:302022-02-17T16:39:34+5:30
Reliance Jio : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि व्होडाफोन-आयडियाला (Vodafone-Idea) मोठा झटका बसला आहे.
नवी दिल्ली : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि व्होडाफोन-आयडियाला (Vodafone-Idea) मोठा झटका बसला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या डेटानुसार रिलायन्स जिओने डिसेंबर 2021 मध्ये 12.9 मिलियन ग्राहक गमावले. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारती एअरटेलने याच महिन्यात 1.1 मिलियन आणि 0.47 मिलियन युजर्स जोडले. व्होडाफोन-आयडियाने डिसेंबरमध्ये पुन्हा 1.6 लाख युजर्स गमावले.
मार्केट शेअरच्या बाबतीत, रिलायन्स जिओकडे 36 टक्के, त्यानंतर भारती एअरटेल 30.81 टक्के, व्होडाफोन-आयडिया जवळ 23 टक्के,बीएसएनएल आणि एमटीएनएलचे अनुक्रमे 9.90 टक्के आणि 0.28 टक्के आहेत. बीएसएनएल देशभरात 4G नेटवर्क सुरू करण्यापासून दूर आहे, ग्राहक बीएसएनएलकडे वळले आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे नोव्हेंबरच्या अखेरीस खासगी दूरसंचार कंपन्यांकडून लागू करण्यात येणारी प्रीपेड दरवाढ आहे.
बीएसएनएलने जोडले नवीन युजर्स
खाजगी दूरसंचार कंपन्यांनी कमी पैसे देणाऱ्या ग्राहकांपासून मुक्ती मिळवली, ज्यामुळे त्यांचा सरासरी महसूल प्रति युजर्सच्या (ARPU) आकड्यात सुधारणा होईल आणि बीएसएनएलने नवीन ग्राहक जोडले. मुळात ही सर्वांसाठी एक फायद्याची परिस्थिती आहे. बीएसएनएलने महिन्याभरात प्रभावीपणे जास्तीत जास्त ग्राहक जोडले. टेलिकॉम कंपनीचे 4G नेटवर्क एकदा लाइव्ह झाले की ते अधिक परवडणारे असल्याने लोक खाजगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा त्याला प्राधान्य देतील याचा हा पुरावा आहे. या डेटामुळे बीएसएनएलचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.
8.54 मिलियन युजर्सनी केला नंबर पोर्ट
महिन्यादरम्यान, एकूण 8.54 मिलियन मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) विनंत्या करण्यात आल्या, ज्यामध्ये 4.91 मिलियन विनंत्या झोन-1 मधून आल्या आणि उर्वरित 3.63 मिलियन विनंत्या झोन-2 मधून आल्या. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी झोन-1 मध्ये सर्वाधिक विनंत्या महाराष्ट्रात करण्यात आल्या, तर मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी झोन-2 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक विनंत्या करण्यात आल्या.