जिओला 'रिंग वॉर'द्वारे प्रत्युत्तर; एअरटेल, व्होडाफोनने केली आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 02:19 PM2019-10-02T14:19:42+5:302019-10-02T14:22:03+5:30
Jio vs Airtel and Vodafone : अन्य कंपन्यांच्या नेटवर्ककडून कॉल आल्यास त्या कंपन्या जिओला पैसे देतात.
मुंबई : देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कोल्ड वॉर सुरू झाले आहे. जिओने स्वस्तातील कॉलिंग, एसएमएस, इंटरनेट सेवा पुरविल्याने आधीपासून भरमसाठ पैसे उकळणाऱ्या कंपन्यांना झुकावे लागले आहे. मात्र, जिओने आणखी एका कारणावरून या कंपन्यांना नामोहरम केले आहे.
अन्य कंपन्यांच्या नेटवर्ककडून कॉल आल्यास त्या कंपन्या जिओला पैसे देतात. तसेच जिओवरून अन्य कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल केल्यास तेवढे पैसे जिओ या कंपन्यांना अदा करते. यावरून एअरटेलने गेल्या महिन्यात जिओवर गंभीर आरोप केले होते. एअरटेलने जिओवर दुसऱ्या नेटवर्कच्या वापरासाठीच्या शुल्कासोबत खेळ मांडल्याचा आरोप केला होता.
कंपन्यांमध्ये एक करार केलेला असतो. त्यानुसार कॉल करण्यासाठी जर दुसऱ्या नेटवर्कचा वापर केला गेला असेल तर त्याला मिनिटाला ठराविक रक्कम द्यावी लागते. याला इंटरकनेक्ट युसेज चार्ज असे म्हणतात. जिओने यामध्येच छेडछाड केल्याचा आरोप एअरटेलने केला होता. यानंतर जिओनेही यावर स्पष्टीकरण दिले होते. आता एअरटेल, व्होडाफोन या कंपन्यांनीही फोन केल्यानंतरची वाजणारी रिंग कमी केली आहे.
एखादा फोन फोन आल्यावर उचलू शकत नसल्यास तो मिसकॉल होतो किंवा उचलायला जाताच फोन रिंग बंद होते. यामुळे समोरच्यानेच कट केला असेल असे वाटते. मात्र, जिओने ही खेळी करताना रिंगची वेळच कमी केली होती. यामुळे समोरच्याला रिटर्न कॉल करावा लागतो. असे झाल्यास कॉल करणाऱ्या कंपनीला इंटरकनेक्ट युसेज चार्ज द्यावा लागतो. जिओच्या या कृत्यामुळे एअरटेल, व्होडाफोन या कंपन्यांच्या मोबाईल नंबरवर मिसकॉल जात होते. त्यांच्या नंबरवरून फोन केल्यास जिओला पैसे द्यावे लागत होते. यामुळे या कंपन्यांना नुकसान होत होते. हे पैसे वाचविण्याचा प्रयत्न या कंपन्यांनी केला आहे. तसे पत्रच एअरटेलने ट्रायला दिले असल्याचे सुत्रांनी सांगितले.
ग्राहकांना त्रास
आता कंपन्यांनी 30 सेकंदांऐवजी रिंगची वेळ 25 सेकंद केल्याने ग्राहकांना त्रास होणार आहे. तर जिओने 20 सेकंद केले आहे. यामुळे नाहक मिसकॉल येत बसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.