पुढील आठवड्यापासून JioPhone Next ची प्री-बुकिंग होऊ शकते सुरु; जियो पुन्हा मोडणार का विक्रीचे विक्रम?
By सिद्धेश जाधव | Published: August 27, 2021 01:09 PM2021-08-27T13:09:33+5:302021-08-27T16:42:30+5:30
JioPhone Next: JioPhone Next च्या प्री बुकिंगची सुरवात पुढल्या आठवड्यापासून होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Reliance Jio ने यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत JioPhone Next स्मार्टफोनची घोषणा केली होती. हा जगातील सर्वात किफायतशीर 4G स्मार्टफोन असेल, असा दावा कंपनीने केला होता. विशेष म्हणजे या स्मार्टफोनसाठी कंपनीने गुगल सोबत हातमिळवणी देखील केली आहे. हा फोन 10 सप्टेंबर 2021 पासून विक्रीसाठी उपल्बध होईल, असे एजीएममध्ये कंपनीने सांगितले होते. आता जियोफोन नेक्स्टची प्री-बुकिंग डेट लीकच्या माध्यमातून समोर आली आहे.
91Mobiles च्या रिपोर्टनुसार, भारतात JioPhone Next ची प्री-बुकिंग पुढल्या आठवड्यापासून सुरु होईल. जियोने घोषणेच्या वेळी आगामी 4G स्मार्टफोनचे फोटोज शेयर केले होते, त्यामुळे या फोनच्या डिजाईनची माहिती मिळाली होती. तसेच कंपनीने या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स देखील सांगितले होते. जियोफोन नेक्स्टची किंमत मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.
JioPhone Next चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
JioPhone Next मध्ये एक 5.5-इंचाचा HD डिस्प्ले देण्यात येईल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये Qualcomm QM215 प्रोसेसर असेल. तसेच या फोनमध्ये 2GB किंवा 3GB RAM आणि 16GB किंवा 32GB ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा फोन Android 11 (Go Edition) वर चालेल. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. JioPhone Next एक ड्युअल सिम 4G फोन असेल. ज्यात 2,500mAh बॅटरी मिळू शकते.
JioPhone Next ची किंमत
JioPhone Next ची अधिकृत किंमत मात्र अजूनही समोर आली नाही. कंपनीने हा जगातील सर्वात किफायतशीर 4G स्मार्टफोन असेल असे म्हटले आहे. काही लिक्सनुसार, JioPhone Next स्मार्टफोनची भारतीय किंमत 3,499 रुपयांच्या आसपास असू शकते.