जिओनं रचला इतिहास, जगातल्या सर्व स्मार्टफोन्सना मागे टाकत जिओ फोन बनला नंबर 1
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 03:02 PM2018-05-25T15:02:04+5:302018-05-25T15:02:04+5:30
जिओ फोन 2018 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच जगभरात बेस्ट सेलिंग फीचर फोन म्हणून समोर आला आहे.
नवी दिल्ली- 2018 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच जगभरात बेस्ट सेलिंग फीचर फोन म्हणून जिओ फोन समोर आला आहे. काऊंटर पॉइंटच्या रिपोर्टनुसार, जिओ फोननं 2018च्या पहिल्याच तिमाहीत जागतिक बाजारातील जवळपास 15 टक्के हिस्सा स्वतःच्या नावे केला आहे. तर दुसरीकडे एचएमडी ग्लोबल (नोकिया) 14 टक्के शेअर्ससह दुस-या स्थानी आहे. आयटेलनं 13 टक्क्यांसह तिसरं स्थान मिळवलं आहे. सॅमसंग आणि टेक्नोच्या फीचर्स फोननं बाजारातील जवळपास 6 टक्के हिस्सा मिळवला आहे. वर्षभरातच जिओ फोननं भारतात एक नवी उंची गाठली आहे.
तत्पूर्वी एका रिपोर्टनुसार, जिओ फोन नंबर 1 ब्रँड असल्याचंही समोर आलं होतं. आता यावर काऊंटर पॉइंटनं यावर शिक्कामोर्तब केलं आहे. वर्ष 2018च्या पहिल्या तिमाहीत या फोनच्या जागतिक स्तरावरील बाजारात 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिओ फोन आणि नोकिा एचएमडी फोनमुळे जागतिक बाजाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अवघ्या 1500 रुपयांचं डिपॉजिट घेऊन जिओफोन ग्राहकांना सादर करण्यात आला. अर्थात तीन वर्षांनंतर हे पैसे युजरला परत मिळण्यास असल्यामुळे हा फोन ग्राहकांना मोफत मिळणार असल्यामुळे यावर उड्या पडल्या आहेत.
देशभरातून याला विक्रमी प्रतिसाद लाभला. जिओफोन आता ग्राहकांना पाठविण्यास प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता याच्या पुढील टप्प्यासाठी नोंदणी सुरू होण्याआधी रिलायन्सने आपल्या रणनीतीत बदल केल्याचे दिसून येत आहे. जिओफोन हा फायरफॉक्स ओएसपासून विकसित करण्यात आलेल्या कायओएस या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारा आहे. मात्र जिओफोनमध्ये सर्व अँड्रॉइड अॅप्स चालत नसल्यामुळे युजर्सची कुचंबणा होत आहे. यामुळे पुढील मॉडेल हे शुद्ध अँड्रॉइडवरच चालणारे असावे, असा विचार रिलायन्सचे व्यवस्थापन करत आहे. यामुळे आता जिओफोनचे उत्पादन थांबविण्यात आले असून स्वस्त अँड्रॉइड फोनच्या उत्पादनाबाबत विचार केला जात आहे.