जम्बो बॅटरीने सज्ज जिओनी एम ७ पॉवर
By शेखर पाटील | Published: November 16, 2017 02:13 PM2017-11-16T14:13:14+5:302017-11-16T14:16:38+5:30
जिओनी कंपीनीने तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असणारा जिओनी एम ७ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना १६,९९९ रूपये मूल्यात सादर केला आहे.
मुंबई - जिओनी कंपीनीने तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असणारा जिओनी एम ७ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना १६,९९९ रूपये मूल्यात सादर केला आहे.
भारतीय युजर्ससाठी बॅटरी हा अतिशय महत्वाचा घटक असल्याचे अनेकदा अधोरेखीत झाले आहे. यामुळे अनेक कंपन्या उत्तम बॅटरीला प्राधान्य देत असतात. या अनुषंगाने जिओनी कंपनीने याच प्रकारातील जिओनी एम७ पॉवर हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. वर नमूद केल्यानुसार यात फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल दोन दिवसांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यातील दुसरे महत्वाचे फिचर म्हणजे यात देण्यात आलेला डिस्प्ले होय. जिओनी एम ७ पॉवर या मॉडेलमध्ये ६ इंच आकारमानाचा १४४० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा २.५ डिस्प्ले देण्यात आला असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. याची खासियत म्हणजे हा डिस्प्ले ‘फुल व्ह्यू’ या प्रकारातील असेल. अनेक फ्लॅगशीप स्मार्टफोनमध्ये या प्रकारातील डिस्प्ले असतो. अर्थात जिओनीने तुलनेत कमी मूल्यात हा डिस्प्ले ग्राहकांना या मॉडेलच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
जिओनी एम ७ पॉवर या मॉडेलमध्ये ऑक्टा-कोअर स्नॅगड्रॅगन ४३५ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. ऑटो-फोकस, एफ/२.० अपार्चर आणि एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एफ/२.२ अपार्चरसह ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यात थ्रीडी प्रतिमा काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा अमिगो ५.० हा युजर इंटरफेस असेल. यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स देण्यात आले आहेत.
जिओनी एम ७ पॉवर हा स्मार्टफोन गोल्ड, ब्ल्यू आणि ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ‘अमेझॉन इंडिया’ या शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना २५ नोव्हेंबरपासून खरेदी करता येणार आहे. तर १७ नोव्हेंबरपासून याची अगावू नोंदणी करण्यात येत आहे.