जंबो बॅटरीने सज्ज मोटो ई ४ प्लस
By शेखर पाटील | Published: July 25, 2017 11:47 AM2017-07-25T11:47:21+5:302017-07-25T16:35:21+5:30
मोटोरोला कंपनीने भारतात तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असणारा मोटो ई ४ प्लस हा स्मार्टफोन लाँच केला असून ग्राहकांना हे मॉडेल फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.
मोटोरोला कंपनीने भारतात तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असणारा मोटो ई ४ प्लस हा स्मार्टफोन लाँच केला असून ग्राहकांना हे मॉडेल फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.
अलीकडे बहुतांश स्मार्टफोनमध्ये बॅटरी हा अत्यंत महत्वाचा घटक असल्याचे दिसून येत आहेत. बहुतांश कंपन्या उत्तमोत्तम बॅटरीने सज्ज असणारे मॉडेल लाँच करत आहेत. या पार्श्वभूमिवर लेनोव्होची मालकी असणार्या मोटोरोला मोबिलिटी या कंपनीने मोटो ई ४ प्लस हे मॉडेल भारतीय ग्राहकांना आज दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आले. वर नमूद केल्यानुसार याची खासियत म्हणजे यातील तब्बल ५,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी असेल. यात रॅपीड चार्जरची सुविधादेखील असेल. यात मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील प्रदान करण्यात आले असून फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असेल. अर्थात यावर रिलायन्स जिओसह अन्य व्हिओएलटीई सेवांना वापरता येईल. उर्वरित कनेक्टीव्हिटीत ब्ल्यु-टुथ, जीपीएस, वाय-फाय, मायक्रो-युएसबी आदींचा समावेश असेल.
मोटो ई ४ प्लस या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा २.५ ग्लास वक्राकार डिस्प्ले असेल. क्वॉड-कोअर स्नॅपड्रॅगन ४२७ प्रोसेसरने सज्ज असणार्या या स्मार्टफोनची रॅम तीन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा आहे. या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशयुक्त १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा तर ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्टवरून ९,९९९ रूपये मुल्यात खरेदी करता येणार आहे.
मोटो ई ४ प्लस सोबत कंपनीने काही ऑफर दिल्या आहेत. यात प्रामुख्याने हॉटस्टार या अॅपच्या दोन महिन्याच्या मोफत सबस्क्रिप्शनसह जिओ व आयडियाने मोफत फोर-जी डेटा देण्याची घोषणा आहे. तर मोटो पल्स २ हा हेडफोन या स्मार्टफोनसोबत सवलतीच्या दरात मिळेल.