रिलायन्सच्या दोन स्मार्टफोन्सवर जंबो सवलत
By शेखर पाटील | Published: October 4, 2017 11:12 PM2017-10-04T23:12:19+5:302017-10-04T23:13:03+5:30
रिलायन्सने आपल्या एलवायएफ सी४५१ आणि सी४५९ हे दोन स्मार्टफोन्स विविध सवलतींसह ग्राहकांना सादर करण्याचे जाहीर केले आहे.
रिलायन्सने सेल्युलर सेवेत प्रवेश करतांना अत्यंत किफायतशीर प्लॅन्स सादर करतांना याच पध्दतीने बजेट दरात विविध मॉडेल्सदेखील सादर केले आहेत. अगदी अलीकडे सादर करण्यात आलेल्या जिओफोनला तर अतिशय जोरदार प्रतिसाद लाभला असून ग्राहकांना हा स्मार्टफोन घरपोच मिळण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र एयरटेल कंपनी येत्या काही दिवसांमध्ये दोन हजार रूपयांच्या आत फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे रिलायन्सने या संभाव्य स्पर्धेला तोंड देण्याची तयारी करण्यासाठी रणनिती आखल्याचे आता दिसून येत आहे. या अनुषंगाने कंपनीने आधीच लाँच केलेल्या एलवायएफ सी४५१ आणि एलवायएफसी४५९ या मॉडेल्ससोबत ग्राहकांना विविध सवलती देण्याचे घोषीत केले आहे. २ ऑक्टोबरपासून या सवलीत मिळण्यास प्रारंभ झाला असून २२ ऑक्टोबरपर्यंत त्या ग्राहकांना सादर करण्यात येत आहेत.
रिलायन्स कंपनीच्या एलवायएफ सी४५१ आणि सी४५९ हे स्मार्टफोन्स अनुक्रमे ४,९९९ आणि ४,६९९ रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्यात आले आहेत. आता यांच्यासोबत विविध सवलती मिळणार आहेत. यात प्रामुख्याने ९९ रूपये मूल्याची रिलायन्स जिओच्या प्राईम मेंबरशीपचा समावेश आहे. याच्यासोबत संबंधीत ग्राहकाला ३९९ रूपयांचे व्हाउचर मिळेल. यात ८४ दिवसांपर्यंत प्रत्येक दिवसाला एक जीबी डाटा मिळणार आहे. याशिवाय नऊ महिन्यापर्यंत त्याला ५ जीबी डाटाचे १४९ रूपये दरमहा इतके मूल्य असणारे रिचार्जदेखील मोफत मिळेल. अशा पध्दतीने हे दोन्ही स्मार्टफोन खरेदी करणार्यांना एकंदरीत २,३०७ रूपयांचे अतिरिक्त लाभ देण्यात आले आहेत. याशिवाय रिलायन्स कंपनी लवकरच आधी लाँच केलेल्या विविध हँडसेटवरही याच पध्दतीने विविध सवलती देण्याची शक्यता आहे.