कॅस्परस्कीचा मोफत अँटी व्हायरस
By शेखर पाटील | Published: July 31, 2017 06:14 PM2017-07-31T18:14:16+5:302017-07-31T18:15:11+5:30
संगणक सुरक्षेतील आघाडीचे नाव असणार्या कॅस्परस्की लॅब या कंपनीने जगभरातील संगणक युजर्ससाठी मोफत अँटी व्हायरस देण्याची घोषणा केली आहे.
संगणक सुरक्षेतील आघाडीचे नाव असणार्या कॅस्परस्की लॅब या कंपनीने जगभरातील संगणक युजर्ससाठी मोफत अँटी व्हायरस देण्याची घोषणा केली आहे.
अँटी व्हायरस हा आपल्या डिजीटल आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. संगणकापासून ते विविध स्मार्ट उपकरणांमध्ये याचा वापर आपण करत असतो. सध्या अनेक मोफत तसेच व्यावसायिक पातळीवरील अँटी व्हायरस उपलब्ध आहेत. यात आता कॅस्परस्की या रशियन कंपनीने मोफत अँटी व्हायरस देण्याचे जाहीर केले आहे. या कंपनीचे संस्थापक तथा सीईओ युजीन कॅस्परस्की यांनी एका ब्लॉग पोस्टद्वारे याची घोषणा केली आहे. कॅस्परस्की फ्री या नावाने हा मोफत अँटी व्हायरस वापरता येणार आहे. यात संगणकातील माहितीला स्कॅन करण्यासह याला सुरक्षा कवच प्रदान करण्याची सुविधा असेल. अन्य प्रिमीयम अँटी व्हायरस सॉफ्टवेअर्सप्रमाणे यात आधुनीक (उदा. ऑनलाईन पेमेंट प्रोटेक्शन, व्हीपीएन आदी) फिचर्स नसले तरी प्राथमिक पातळीवरील वापरासाठी तो उपयुक्त आहे. विशेष करून अनेक स्पायवेअर्स चोरट्या मार्गाने संगणकात प्रवेश करून गोपनीय माहिती चोरत असून त्यांना अटकाव करण्याचे काम तो करू शकतो. सध्या रशियासह काही राष्ट्रांमधील युजर्स याला मोफत डाऊनलोड करून वापरू शकतात. २५ जुलै रोजी कॅस्परस्की लॅबच्या स्थापनेस २० वर्षे झाल्याप्रित्यर्थ आता जगातल्या अन्य देशांमधील युजर्सला क्रमाक्रमाने याचे डाउनलोड उपलब्ध करण्यात येत आहे. भारतात सप्टेंबर महिन्यात ही सुविधा मिळणार असल्याचे कॅस्परस्की कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे भारतीय युजर्स सप्टेंबर महिन्यातच याचा वापर करू शकतील.
मात्र काही अमेरिकन तज्ज्ञांनी कॅस्परस्की कंपनी त्यांच्या प्रत्येक युजरची गोपनीय माहिती रशियन सरकारला देत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे संगणक हॅक करण्यापासून ते त्यातील माहितीचा गैरवापर होण्याचे प्रकार होतात असा ठपकादेखील ठेवण्यात आला आहे. अर्थात अमेरिका आणि रशियातील वर्चस्वाचा वाद पाहता असल्या स्वरूपाचे आरोप हे आधीपासूनच करण्यात येत असल्याची बाबही तितकीच खरी आहे. यामुळे हा प्राथमिक स्वरूपाचा हा अँटी व्हायरस वापरणे तसे धोक्याचे नसल्याचेही जगातील अन्य तज्ज्ञांचे मत आहे.