कार्बन टिटानियम जंबो स्मार्टफोन दाखल
By शेखर पाटील | Published: October 25, 2017 08:09 AM2017-10-25T08:09:57+5:302017-10-25T08:11:58+5:30
कार्बन कंपनीने आपल्या टिटानियम या मालिकेतील टिटानियम जंबो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ६,४९० रूपये मूल्यात सादर केला आहे.
कार्बन कंपनीने आपल्या टिटानियम या मालिकेतील टिटानियम जंबो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ६,४९० रूपये मूल्यात सादर केला आहे.
मध्यंतरी चीनी कंपन्यांच्या झंझावातामुळे भारतीय कंपन्या गलीतगात्र झाल्याचे चित्र होते. मात्र अलीकडेच एंट्री लेव्हल या प्रकारात पुन्हा एकदा भारतीय कंपन्यांनी पकड घेतल्याचे दिसून येत आहे. विशेषत: मायक्रोमॅक्सने अनुक्रमे बीएसएनएल आणि व्होडाफोनसोबत भारत १ आणि भारत १ अल्ट्रा तर कार्बनने एयरटेलसोबत कार्बन ४० हे मॉडेल सादर करून जिओफोनला तगडे आव्हान दिले आहे. या सर्व गदारोळात कार्बन टिटानियम जंबो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर १६ तासांपर्यंत चालत असल्याचा कार्बनचा दावा आहे.
उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, कार्बन टिटानियम जंबो या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी अर्थात १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले दिलेला आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर असेल. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविता येईल. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यात भारतीय भाषांचा सपोर्ट प्रदान करण्यात आला असून याचा युजर्सला उपयोग होऊ शकतो. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, युएसबी ओटीजी आदी फिचर्स असतील. कार्बन टिटानियम जंबो हे मॉडेल भारतीय ग्राहकांना ब्लॅक आणि शँपेन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.