अलर्ट! हॅकर्सची तुमच्यावरही नजर, मोबाईलला सायबर अटॅकचा धोका; 'असा' करा फ्रॉडपासून बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 01:57 PM2022-05-07T13:57:55+5:302022-05-07T13:59:14+5:30
मोबाईलच्या या वाढत्या वापरामुळेच सायबर क्रिमिनल्सची नजर वेळोवेळी आपल्या फोनवर असते. दररोज अनेक नव्या घटना समोर येत आहेत.
नवी दिल्ली - टेक्नॉलॉजीच्या जगात हॅकींगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हॅकींगचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. स्मार्टफोन हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये असतात. भारतात कोरोना लॉकडाऊननंतर मोबाईलच्या वापरात मोठी वाढ झाली आहे. बँकिंगशी संबंधित कामं किंवा शॉपिंग, तिकीट बुक करणं, फिरायला जाण्यासाठी अशा अनेक गोष्टींची तयारी फोनवरच केली जाते.
मोबाईलच्या या वाढत्या वापरामुळेच सायबर क्रिमिनल्सची नजर वेळोवेळी आपल्या फोनवर असते. दररोज अनेक नव्या घटना समोर येत आहेत. मोबाईल आणि ईमेलवर अशा फेक लिंक्स येतात ज्यावर क्लिक केल्यानंतर युजर्सची संपूर्ण माहिती हॅकर्सकडे पोहोचते. तसंच एखादं App इन्स्टॉल करतानाही डेटा चोरी होते. सायबर सुरक्षा आणि अँटी व्हायरस कंपनी कॅस्परस्काय लॅबने (Kaspersky) गेल्या वर्षी मोबाईल डिव्हाइसवर झालेल्या 35 लाखांहून अधिक सायबर हल्ल्यांची माहिती मिळवली होती.
मोबाइल सुरक्षा देणारी प्रायव्हेट कंपनी जिमपेरियमने (Zimperium) दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 पैकी एका मोबाईलवर मेलवेअयरचा अटॅक झाला आहे. येणाऱ्या काळात 10 पैकी 4 मोबाईलवर सायबर अटॅकचा धोका आहे. कोट्यवधी मोबाईल हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत.
हॅकर्सच्या हल्ल्यापासून तुम्ही तुमचा फोन वाचवू शकता. यासाठी अलर्ट राहण्याची गरज आहे. मोबाईल डेटाच्या वापरात अचानक वाढ होणं, स्क्रिनवर पॉप-अप दिसणं, फोनची बॅटरी लवकरण संपणं, अनोळखी App दिसणं अशा गोष्टी दिसल्यास अलर्ट व्हा. हॅकर्सच्या हातात तुमच्या फोनचं ऑपरेटिंग सिस्टम आलं असल्याचं हे ठरू शकतं.
सार्वजनिक ठिकाणीच्या वायफायचा वापर करू नका. तसेच फ्री वायफाय वापरत असाल, तर त्यावेळी फायनेंशियल ट्रान्झेक्शन करू नका. ऑनलाईन पेमेंट, बँकिंगसंबंधी गोष्टी करू नका. ऑनलाईन शॉपिंग करताना अधिकृत वेबसाईटचा वापर करा. नव्या वेबसाईटचा वापर करताना यूआरएलवर लक्ष द्या. https पासून यूआरएल सुरू होणं गरजेचं आहे.
वेगवेगळ्या अकाउंट्ससाठी वेगवेगळे पासवर्ड्स ठेवा. पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी अनेक जण सर्व अकाउंटसाठी सारखेच पासवर्ड ठेवतात. पण ते अत्यंत धोक्याचं ठरू शकतं. पासवर्ड स्ट्राँग असणं तसंच तो वेळोवेळी बदलणं गरजेचं आहे. नेहमी विश्वासार्ह अँटी व्हायरस App चा वापर करा आणि फोन स्टोरेज सतत क्लीन करत राहा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.