ऑर्डर केला 70 हजारांचा iPhone पण मिळालं 5 रुपयांचं नाणं अन् साबण; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 02:27 PM2021-10-23T14:27:34+5:302021-10-23T14:28:53+5:30
iphone 12 worth rs 70000 on amazon receives vim bar : आयफोन 12 च्या ऐवजी एका ग्राहकाला चक्क साबण आणि पाच रुपयांचं नाणं बॉक्समध्ये मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - ऑनलाईन खरेदी करण्याकडे अनेकांचा अधिक कल असतो. सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. आयफोन 12 च्या ऐवजी एका ग्राहकाला चक्क साबण आणि पाच रुपयांचं नाणं बॉक्समध्ये मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नूरूल अमीन या व्यक्तीने मोठ्या उत्साहात अॅमेझॉनवरून आयफोन 12 ऑर्डर केला होता. एका आठवड्यानंतर त्यांना ऑनलाईन पार्सल मिळालं पार्सल पोहोचल्यानंतर त्यांना खूपच आनंद झाला. पण पार्सल उघडताच त्यांना मोठा धक्का बसला. कारण 70 हजार 900 रुपयांच्या फोन ऐवजी ब़ॉक्समध्ये एक विम बार साबण आणि पाच रुपयाचं नाणे मिळालं. पण पोलिसाच्या मदतीने आता या व्यक्तीला अखेर फोनचे पैसे आता परत मिळाले आहे.
बॉक्समध्ये एक विम डिशवॉश बार आणि पाच रुपयांचं नाणं
न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, नुरूल अमीन यांनी अॅमेझॉनवरुन 12 ऑक्टोबरला फोनची ऑर्डर केली होती. आपल्या अॅमेझॉनपे कार्डवरून पेमेंट केले होते. 15 ऑक्टोबरला पार्सल पोहोचले. डिलीव्हरी बॉयच्या समोर एक 'अनबॉक्सिंग' व्हिडियो बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बॉक्समध्ये फक्त एक विम डिशवॉश बार आणि पाच रुपयांचं नाणं मिळालं. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होता. त्यावेळी तपासादरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
झारखंडमध्ये 25 सप्टेंबरपासून फोनचा होत होता वापर
तपास सुरू केल्यानंतर उघड झाले की, जो फोन बुक करण्यात आला होता. तो यावर्षी सप्टेंबर पासून झारखंडमध्ये कोणाकडून तरी वापरला जात होता. पोलिसांनी कव्हरवर मिळालेल्या आयएमईआय नंबरच्या तपासावरून हा खुलासा झाला. आम्ही अॅमेझॉन अधिकारी आणि तेलंगाना स्थित विक्रेत्याशी संपर्क केला. झारखंडमध्ये 25 सप्टेंबर पासून फोनचा वापर होत होता. ऑर्डर ऑक्टोबरमध्ये दिली होती. फोनचा स्टॉक नव्हता, असे विक्रेत्यांनी सांगितले. नुरूलचे पैसे परत दिले जातील, असं विक्रेत्याने सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.