इन्स्टाग्राम मुलींसाठी धोकादायक ठरतंय का? कसं होतंय नुकसान?, अहवालात धक्कादायक माहिती समोर...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 05:51 PM2021-09-30T17:51:21+5:302021-09-30T17:53:11+5:30
फेसबुक लवकरच लहान मुलांसाठी इन्स्टाग्राम अॅप लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली होती. फेसबुक सध्या इन्स्टाग्रामसाठी एका नव्या व्हर्जनवर काम करत असून हे अॅप खास १३ वर्षांखालील मुलांसाठी असणार आहे.
फेसबुक लवकरच लहान मुलांसाठी इन्स्टाग्राम अॅप लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली होती. फेसबुक सध्या इन्स्टाग्रामसाठी एका नव्या व्हर्जनवर काम करत असून हे अॅप खास १३ वर्षांखालील मुलांसाठी असणार आहे. पण फेसबुकनं आता 'इन्स्टाग्राम किड्स'ची योजना थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत या योजनेला कडाडून विरोध होत आहे त्यामुळेच फेसबुकनं योजना थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
इन्स्टाग्राम किड्सला नेमका विरोध का केला जातोय? यामागचं मोठं कारण समोर आलं आहे. हे अॅप लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतं. त्यात मुलींसाठी अधिक धोकादायक असल्याचं बोललं जात आहे. त्यासंबंधीचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलनं प्रकाशित केलेल्या एका अहवालानंतर मोठा धुमाकूळ उडाला आहे. यात इन्स्टाग्रामुळे लहान मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मुख्यत्वे मुलींवर अधिक परिणाम होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. इन्स्टाग्राममुळे मुलींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे आणि त्यांना 'बॉडी इमेज'चा त्रास होऊ लागला आहे. काहींमध्ये तर इंटिंग डिसऑर्डरची समस्या देखील निर्माण झाली आहे, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
मुलींवर काय होतोय परिणाम?
फेसबुकच्या अंतर्गत स्त्रोतांतून समोर आलेल्या माहितीनुसार अॅपमध्ये प्रत्येकी पैकी एका अल्पवयीन मुलीला बॉडी इमेजच्या मुद्द्याला प्राधान्य दिलं आहे. जवळपास १३ टक्के ब्रिटीश आणि ६ टक्के अमेरिकन अल्पवयीन युझर्सचा सर्व्हे यात करण्यात आला आहे. यासोबतच डिप्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचीही तक्रार मुलींनी केली आहे.
दरम्यान, इन्स्टाग्रामनंही यावर प्रतिक्रिया दिली असून संबंधित अहवाल हा मोजक्या सॅम्पलवर आधारित आहे. हा अत्यंत सूक्ष्म सर्व्हे होता आणि आम्ही त्यामाध्यमातून युझर्सला येणाऱ्या समस्यांची माहिती घेत होतो. सोशल मीडियाचे परिणाम वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. अनेकांना याचं नुकसान होतं, तर अनेकांना याचा फायदा देखील होतो. याशिवाय इन्स्टाग्रामचं हेही म्हणणं आहे की, इन्स्टाग्रॅम अॅप सध्या कोट्यवधी युझर्स वापर करत आहेत. त्यामुळे मोजक्या लोकांचा सल्ला पूर्णपणे योग्य आहे असं मानता येणार नाही.