Hoil Special : जर रंग खेळताना फोन पाण्यात भिजला तर वापरा 'या' टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 01:20 PM2019-03-19T13:20:58+5:302019-03-19T13:21:33+5:30
होळीचा उत्सव सर्वांनाच पसंत असतो. पाणी आणि रंगाशिवाय या उत्सवाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.
(Image Credit : Phones R Fixed)
होळीचा उत्सव सर्वांनाच पसंत असतो. पाणी आणि रंगाशिवाय या उत्सवाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. होळीला पाण्यात भिजणे आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगण्याची एक वेगळीच मजा असते. पण हे करत असताना त्वचेची, डोळ्यांची आणि कानांची काळजी घेणे जसे महत्त्वाचे आहे तसेच फोनचीही काळजी घ्यावी लागते.
होळीला रंग आणि पाणी खेळताना फोनचा बचाव करणं तसं कठीण काम आहे. पण फोनचा बचाव करण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले जाऊ शकतात. जर अशावेळी फोनमध्ये पाणी गेलं तर फोन खराब होण्याची शक्यता फार जास्त वाढते. त्यामुळे आम्ही फोनचा बचाव करण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत.
१) जर फोन पाण्यात पडला किंवा पाण्याने भिजला असेल तर लगेच स्वीच ऑफ करावा. कारण भीजलेला फोन वापरणे महागात पडू शकतं. कारण फोनमध्ये पाणी गेल्यावर सर्किट्सचं नुकसान होतं आणि स्मार्टफोन नेहमीसाठी खराब होऊ शकतो.
२) स्मार्टफोन स्वीच ऑफ केल्यानंतर स्वच्छ कापडाने त्याला कोरडा करा. त्यानंतर टिशू पेपर किंवा एखाद्या कापडामध्ये फोन गुंडाळा. जेणेकरून फोनमध्ये गेलेलं पाणी शोषलं जाईल. त्यानंतर लगेच फोनमधून सीम कार्ड आणि मेमरी कार्ड बाहेर काढा. फोन व्यवस्थित झटका जेणेकरून त्यातील पाणी बाहेर येईल.
३) त्यानंतर स्मार्टफोन तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा आणि डब्याचं झाकण लावा. तांदळाचे दाणे फोनमध्ये गेलेलं पाणी शोषून घेतात. या डब्यात फोन २४ तासांसाठी तसाच राहू द्या.
४) फोन स्वच्छ करण्यासाठी बॅक पॅनर उघडून फोन उन्हातही ठेवू शकता. उन्हातही फोनमध्ये गेलेलं पाणी सुकतं. हे करत असताना याचीही काळजी घ्या की, फोन फार कडक उन्हात जास्तवेळ ठेवू नका. कारण जास्त उन्हामुळे फोनमधील प्लॅस्टिक कॉम्पोनेंट वितळू शकतं.
५) त्यानंतर फोन ऑन करा आणि त्यातील डेटाचा बॅकअप घ्या. शक्यता आहे की, फोनमधील काही पार्ट्समध्ये काही समस्या असेल. किंवा नंतर त्यात काही बिघाड होऊन तुमचा डेटा जाऊ शकतो.
'या' गोष्टी टाळा...
१) जर तुमचा फोन पाणी भिजला असेल आणि फोन वॉरंटी पिरियडमध्ये असेल तर कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस स्टेशनमध्ये घेऊन जा. पण फोन पाण्यात पडला होता हे कंपनीपासून लपवू नका. कारण त्यांना फोन उघडून पाहिल्यावर लगेच ही बाब कळेल. असं असेल तर कंपनी तुम्हाला वॉरंटी देणार नाही.
२) फोनमध्ये पाणी गेलं असेल तर तो हेअरड्रायरने कोरडा करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. हेअरड्रायरची हवा फार गरम असते आणि यामुळे फोनमधील इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स खराब होऊ शकतात. त्यासोबतच फोन कोरडा करण्यासाठी त्याला हॉट ओव्हन किंवा रेडिएटरजवळही ठेवू नका.
३) फोन भिजल्यानंतर चार्जिंगला अजिबात लावू नका. यामुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. तसेच फोनमध्ये कोणतीही टोकदार वस्तू टाकण्याचा प्रयत्न करू नका. असं केल्याने पाणी फोनमध्ये आणखी आत जाण्याची शक्यता असते.