Krutrim AI : Ola मालकाची एआय सेक्टरमध्ये एन्ट्री! पुढील आठवड्यात लाँच होणार पहिले AI चॅटबॉट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 10:07 AM2024-02-06T10:07:46+5:302024-02-06T10:08:54+5:30
Krutrim AI : बहुतेक कंपन्यांनी एआय उत्पादनांवर काम सुरू केले आहे.
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (एआय) युग आहे. गेल्या काही काळापासून एआय क्षेत्रात मोठी भर पडली आहे. बहुतेक कंपन्यांनी एआय उत्पादनांवर काम सुरू केले आहे. ओला कॅब्स (Ola Cabs) आणि ओला इलेक्ट्रिकचे (Ola Electric) संस्थापक भाविश अग्रवाल ( Bhavish Aggarwal) यांची एआय स्टार्टअप कंपनी कृत्रिम ( Krutrim) देखील लवकरच ग्राहकांसाठी आपले पहिले AI उत्पादन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
भाविश अग्रवाल यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर (X) माहिती दिली आहे की, कृत्रिम कंपनीचे पहिले उत्पादन एआय चॅटबॉट असणार आहे. माहिती देण्यासोबतच ओला कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी काही स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. कृत्रिम ॲपची रिलीजपूर्वी टेस्टिंग केली जात असून हे ॲप पुढील आठवड्यात रिलीज होणार आहे.
सध्या, ॲपची नेमकी लॉन्च तारीख अद्याप समोर आलेली नाही. हे कृत्रिम ॲप लॉन्च झाल्यानंतरही एआय मॉडेल्समध्ये सुधारणा करून ते अधिक चांगले केले जाईल. रिपोर्ट्सनुसार, कंपनीची एआय उत्पादने 22 भारतीय भाषा समजू शकतील आणि आठ भाषांमध्ये कंटेंट लिहू शकतील. चॅटबॉट केवळ मूलभूत प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो आणि सूचना देऊ शकतो, असे अनेक पोस्टमध्ये नमूद केले आहे. या एआय कंपनीने कृत्रिम बेस आणि कृत्रिम प्रो तयार केले आहे.
Testing the @Krutrim app before release! Releasing next week. Looking good though we will keep improving the models post launch too. pic.twitter.com/SEbPTLrLit
— Bhavish Aggarwal (@bhash) February 3, 2024
प्रो व्हर्जनबाबत कंपनीचा दावा आहे की, ते एक मल्टीमॉडल फाउंडेशन मॉडेल आहे. तसेच, त्याचे जनरेटिव्ह एआय ॲप्स व्हॉइस-ऐनेबल्ड फीचर्ससह सुसज्ज असतील, असे कंपनीचे म्हणणे आहे. दरम्यान, हे फीचर्स लॉन्चच्या वेळी उपलब्ध होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, भाविश अग्रवाल यांनी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. मात्र, या पोस्टमध्ये नीट पाहिले तर कृत्रिम कधी कधी चुकीचे असू शकते, माहितीसाठी पडताळणी करा, असे तुम्हाला तळाशी लहान अक्षरात लिहिलेले दिसेल.