लाव्हाचा बजेट स्मार्टफोन: जाणून घ्या सर्व फिचर्स
By शेखर पाटील | Published: August 28, 2018 06:52 PM2018-08-28T18:52:57+5:302018-08-28T18:53:27+5:30
लाव्हा कंपनीने बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला असून यात किफायतशीर मूल्यात उत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
लाव्हा कंपनीने बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला असून यात किफायतशीर मूल्यात उत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
लाव्हा कंपनीने झेड ६० एस हा अतिशय किफायतशीर मूल्याचा स्मार्टफोन ग्राहकांना सादर केला आहे. याची खासियत म्हणजे हे मॉडेल अँड्रॉइड गो (ओरियो एडिशन) या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा आहे. या मॉडेलचे मूल्य ४,९४९ रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आले आहे. अर्थात हा स्मार्टफोन फक्त ऑफलाईन पध्दतीत उपलब्ध करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत हे मॉडेल खरेदी करणार्या ग्राहकासाठी कंपनीने वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा जाहीर केली आहे. तर रिलायन्सच्या जिओने या मॉडेलसोबत २,२०० रूपयांचा कॅशबॅकही सादर केला आहे.
लाव्हा झेड ६० एस या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १६:९ असा आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम १ जीबी व इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. यामध्ये २,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. यातील मुख्य आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे प्रत्येकी ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे आहेत. यामध्ये एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकस हे फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये बोके इफेक्ट देण्याची सुविधा दिलेली आहे. तर यामध्ये लाव्हा कंपनीने विकसित केलेल्या शार्प क्लिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे यात अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा काढता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.