लावाचे चार नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल
By शेखर पाटील | Published: October 10, 2017 02:43 PM2017-10-10T14:43:23+5:302017-10-10T14:43:56+5:30
लावा या भारतीय कंपनीने चार नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात झेड ६०, झेड ७०, झेड ८० आणि झेड ९० यांचा समावेश आहे.
लावा कंपनीने भारतात आपल्या झेड मालिकेत चार नवीन स्मार्टफोन सादर केले असून ते सर्व विविध शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. या चारही मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे ५,५००; ८,०००; ९,००० आणि १०७५० रूपये असेल.
लावा झेड ९०
लावा झेड ९० हे या चारही स्मार्टफोनमधील सर्वात उत्तम फिचर्सने सज्ज असणारे मॉडेल आहे. यात ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. अर्थात याच्या मागील बाजूस ८ व २ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे असतील. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. या दोन्ही कॅमेर्यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा काढता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एलईडी फ्लॅशयुक्त ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. लावा झेड ९० या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. १.३ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसरने युक्त असणार्या या मॉडेलची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असेल. यातील बॅटरी २७५० मिलीअँपिअर क्षमतेची असून या मॉडेलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यावर लावा कंपनीचा स्टार ४.१ हा युजर इंटरफेस असेल. हा स्मार्टफोन गोल्ड आणि ब्ल्यू या दोन रंगांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येईल.
लावा झेड ८०
या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर असेल. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे अनुक्रमे ८ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. हा स्मार्टफोन ड्युअल सीमकार्डला सपोर्ट करणारा असून गोल्ड आणि ब्लॅक या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच हे मॉडेलदेखील अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यावर लावा कंपनीचा स्टार ४.१ हा युजर इंटरफेस असेल. तर यातील बॅटरी २,५०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.
लावा झेड ७०
हा स्मार्टफोन ५ इंची आकारमानाच्या आणि एचडी क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज असेल. यात मीडियाटेक एमटी६७३७ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा असेल. यातील कॅमेरे ८ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. यातील फिंगरप्रिंट स्कॅनर हे स्मार्टफोन लॉक/अनलॉक करण्यासोबत विविध अॅप्सच्या वापरासह सेल्फी घेण्यासाठी वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील बॅटरी २५०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल व्हाईट गोल्ड आणि ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे.
लावा झेड ६०
हा स्मार्टफोन या मालिकेतील एंट्री लेव्हलचा आहे. यातील पाच इंच आकारमानाचा डिस्प्ले एफडब्ल्यूव्हिजीए अर्थात ८५४ बाय ४८० पिक्सल्स क्षमतेचा असेल. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा आहे. यातील मुख्य आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. तर पॉवर सेव्हर मोडसह यातील बॅटरी २५०० मिलीअँपिअर क्षमतेचे आहे. हे मॉडेल गोल्ड आणि ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.