लावाचे हेलियम १२ नोटबुक भारतीय बाजारपेठेत दाखल
By शेखर पाटील | Published: October 13, 2017 12:50 PM2017-10-13T12:50:40+5:302017-10-13T12:53:29+5:30
लावा कंपनीने हेलियम १२ हे नोटबुक भारतीय ग्राहकांना १२,९९९ रूपये मूल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे. लावा या भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनीने गेल्या वर्षी हेलियम १४ या मॉडेलच्या माध्यमातून लॅपटॉप उत्पादनात पदार्पण केले होते
लावा कंपनीने हेलियम १२ हे नोटबुक भारतीय ग्राहकांना १२,९९९ रूपये मूल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे. लावा या भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनीने गेल्या वर्षी हेलियम १४ या मॉडेलच्या माध्यमातून लॅपटॉप उत्पादनात पदार्पण केले होते. या मॉडेलला चांगला प्रतिसाद लाभला होता. या पार्श्वभूमिवर आता हेलियम १२ हे मॉडेल लाँच करण्यात आले आहे. याचे वजन फक्त १.१३ किलोग्रॅम इतके असल्याने ते वापरण्यासाठी अतिशय सुलभ असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. लावा हेलियम १२ या मॉडेलमध्ये १६:९ या गुणोत्तरासह १२.५ इंच आकारमानाचा आणि १३६६ बाय ७६८ पिक्सल्स म्हणजे एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात इंटेलचा क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात असेल. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत तर हार्डडिस्कसह एक टेराबाईटपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल.
लावा हेलियम १२ या मॉडेलमधील बॅटरी तब्बल १०,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून ती उत्तम बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात दोन युएसबी तसेच युएसबी ३.१ पोर्ट असतील. यासोबत ब्लॅकलिट प्रकारचा कि-बोर्ड, ग्लास टचपॅड, फिंगरप्रिंट सेन्सर, कोर्टना हा डिजीटल असिस्टंट, दोन स्पीकरयुक्त ध्वनी प्रणाली आदी फिचर्स आहेत. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथची सुविधा असेल. यात व्हिजीए क्षमतेचा कॅमेरा असेल. विंडोज १० प्रणालीच्या अॅनिव्हर्सरी आवृत्तीवर चालणारे हे मॉडेल गोल्ड आणि सिल्व्हर या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. ते ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करता येणार आहे.