Fitbit Smartwatch घेणं पडू शकतं महागात! कॅलरीजच्या ऐवजी जळत आहेत युजर्सचे हात
By सिद्धेश जाधव | Updated: May 6, 2022 11:31 IST2022-05-06T10:42:10+5:302022-05-06T11:31:04+5:30
Google च्या मालकीच्या Fitbit या स्मार्टवॉच कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. कंपनीच्या विरोधात दोन ग्राहकांनी तक्रार केली आहे.

Fitbit Smartwatch घेणं पडू शकतं महागात! कॅलरीजच्या ऐवजी जळत आहेत युजर्सचे हात
Fitbit आपल्या स्मार्ट वियरेबलमधील लोकप्रिय ब्रँड आहे. परंतु आता Google च्या मालकीच्या या कंपनींच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. Fitbit चे डिवाइस खूप जास्त गरम होत आहेत आणि त्यामुळे युजर्सच्या हाताला चटके बसत आहेत, अशी तक्रार करण्यात आली आहे. या संबंधित एक खटला देखील दोन युजर्सनी दाखल केला आहे.
यावर्षी मार्च मध्ये , Google नं 1.7 मिलियन Fitbit Iconic सीरिजचे यूनिट्स बाजारातून मागे घेतले होते. या सीरिजचे डिवाइस ओव्हरहीट होत होते आणि युजर्सची हात भाजत होते. परंतु आता समोर आलं आहे की अन्य सीरिजमध्ये देखील ही समस्या आहे. फिटबिट विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीत असं सांगण्यात आलं आहे की, “ग्राहक कॅलरीज जाळण्यासाठी प्रोडक्ट घेतात, त्वचा नाही.”
फक्त आयकॉनिक नव्हे तर हे स्मार्टवॉच आहेत फॉल्टी
कॅलिफोर्नियामधील दोन युजर्सच्या दाव्यानुसार, फक्त आयकॉनिक नव्हे तर अन्य सीरिजचे डिवाइस देखील ओव्हरहिट होत आहेत. एकाकडे फिटबिट वर्सा लाईट आहे तर दुसरं फिटबिट वर्सा 2 वापरत आहेत. फिटबिट आणि गुगलवर दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये वर्सा, वर्सा 2, वर्सा 3, चार्ज 4, वर्सा लाईट, आयकॉनिक, सेंस, अल्टा एचआर, इन्स्पायर, इन्स्पायर एचआर, इन्स्पायर 2 आणि ब्लेजचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
कंपनीनं केली नाही कारवाई
गुगल किंवा फिटबिट ग्राहकांची समस्या सोडवण्यासाठी कोणतीही मदत करत नाही. असा आरोप देखील करण्यात आला आहे. कंपनी ग्राहकांना दोष देत असल्याचे पुरावे देखील कोर्टात सादर करण्यात आले आहेत. यात सार्वजनिक आणि खाजगी चॅट्सच्या स्क्रीनशॉट्सचा समावेश आहे. मागे घेतलेल्या आयकॉनिक सीरिजची रिफंड प्रक्रिया देखील मंद गतीने सुरु आहे.